पान:करुणादेवी.djvu/57

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



मी चो र ना ही
तु म्ही चो र आ हा त

♣ * * * * * * ♣








 करुणा प्रात:काळी उठे. शीतलेच्या शीतल पाण्यात स्नान करी. नंतर सोमेश्वराचे दर्शन घेऊन ती आपल्या ओरीत एकतारीवर भजन करीत बसे. घटकाभर दिवस वर आला, म्हणजे ती राजधानीत भिक्षा मागे. तिला एकटीला कितीशी भिक्षा लागणार? तिची गोड भजने ऐकून लोक तल्लीन होत. मुले-मुली ओंजळी भरभरून तिला भिक्षा घालीत. करुणा स्वत:पुरती भिक्षा ठेवून उरलेली बाकीच्या अनाथ-पंगुंस देऊन टाकी.

 राजधानीत ती हिंडे. रोज निरनिराळ्या रस्त्यांना जाई. परंतु राजाच्या राजवाड्याकडे, प्रधानाच्या प्रासादाकडे जाण्याचे तिला धैर्य होत नसे. कोठे तरी पती दृष्टीस पडावा म्हणून तिचे डोळे तहानले होते. ओरीत शिरीषचे चित्र हृदयाशी धरून ती बसे. पुन्हा ते चित्र ती ठेवून देई. खरोखरच शिरीष कधी भेटेल ? खरेच कधी भेटेल ?

 वसंत ऋतू आला. सृष्टी सजली. वृक्षांना पल्लव फुटले. कोकिळा कूऊ करू लागली. करुणेला वाढदिवस आठवला. विवाहाचा वाढदिवस. किती तरी वर्षांत तो साजरा झाला नव्हता. यंदा होईल का ? माझ्या जीवनात वसंत केव्हा येईल ? माझ्या शुष्क संसाराला पल्लव केव्हा फुटतील ? माझ्या भावना पुन्हा मंजुळ गाणी केव्हा म्हणून लागतील ? जीवनाचे नंदनवन केव्हा बहरेल, आनंदाने गजबजेल ? यंदा येईल का वसंत ?

 सोमेश्वराच्या मंदिरातील ती प्रख्यात यात्रा वसंत ऋतूतच असे. यात्रेचे दिवस जवळ आले. मंदिराला सुंदर रंग दिला गेला. शेकडो ठिकाणची दुकाने आली. यात्रा म्हणजे कलाकौशल्य, उद्योग, व्यापार,

मी चोर नाही, तुम्ही चोर आहात * ६१