पान:करुणादेवी.djvu/51

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


 “परंतु काहीतरी अर्थ असतो. स्वप्न म्हणजे आपल्याच गतजीवनातील प्रसंगांचे चित्रण. आपल्याच दाबून ठेवलेल्या वृत्तीचे प्रकटीकरण. ज्या व्यक्तींना आपण बाहेर प्रकटपणे भेटू शकत नाही त्यांना स्वप्नात भेटतो. स्वप्न म्हृणजे परिस्थितीवर विजय.”

 “ हेमा, लहानपणचे मी स्वप्न पाहात होतो. आमच्या गावात एक मुलगी होती. तिचे नाव करुणा. तिचे आईबाप लहानपणीच वारले, ती दु:खीकष्टी असे. एकदा ती रडत होती. तिचे अश्रू मी पुसले होते. तिला खाऊ दिला होता. पुन्हा एकदा ती अशीच रडत जात होती; मी तिला हाका मारल्या. ती आली नाही. मोठी अभिमानी होती ती, जरी पोरकी होती. किती वर्षाची आठवण ! आपल्या जीवनाच्या तळाशी अनेक गोष्टी जाऊन बसलेल्या असतात. कधी वादळ आले तर हा सर्व जीवनसागर बहुळला जातो. तळाशी बसलेले प्रकार वर येतात, वरचे प्रकार खाली जातात. मानवी जीवन म्हणजे चमत्कार आहे. हे मन म्हणजे महान् विश्व आहे.”

 “ करुणेचे पुढे काय झाले ?”

 “ कोणाला माहीत.”

 "तिचे लग्न झाले ? "

 “ म्हणतात झाले म्हणून.”

 “शिरीष, तुला तिची काही माहिती नाही ?”

 “आज तरी नाही. इतकी वर्षे मी राजधानीत आहे. आता लहानपणच्या गोष्टींची कोण करतो आठवण ? हेमा, ते पाहा सुंदर ढग.”

 “ खरेच किती छान. एखादे वेळेस आकाशातील देखावे किंती मनोहर दिसतात ! ”

 “ आपल्याही जीवनात एखादे वेळेस केवढी उदात्तता प्रकट होते, नाही ?”

 “शिरीष, परंतु हे मनोरम देखावे काळ्या ढगांतून निर्माण झाले आहेत. भिंती खरवडल्या तर खाली क्षुद्र मातीच दिसते. वरून झिलई, वरून रंग, असे नाही ?”

सचिंत शिरीष * ५५