पान:करुणादेवी.djvu/50

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

दिलास ? अनशन व्रत का नाही घेतलेस ? गुलाम म्हणून बंधनात जगण्यापेक्षा उपवास करून मेला का नाहीस ? तसा मरतास, तर हुतात्मा झाला असतास. लाखो स्वातंत्र्यप्रेमी विहंगांनी तुझी स्तुतिस्तोत्रे म्हटली असती. वृक्षवेलींनी तुझ्या मृत शरीरावर फले उधळली असती. परंतु भुललास, गुलामगिरीच्या गोंडस वंचनेला भाळलास. आता पिंजऱ्यातच बस. तेथेच नाच व खा. "

 “ शिरीष, तुझ्या सुखासाठी जे जे म्हणून मी करावे ते ते तुला त्रासदायकच वाटते."

 “ हेमा, सुख हे स्वतःच्या जीवनातून शेवटी झऱ्याप्रमाणे बाहेर पडले पाहिजे. बाहेरची लिंपालिंपी काय कामाची ? तू कष्टी नको होऊ. लवकरच आपण सुखी होऊ. अभ्रे नेहमी टिकत नाहीत. जातातच.”

 एके दिवशी शिरीष झोपला होता. परंतु झोपेत काही तरी बोलत होता. हेमा जागी झाली. ते बोलणे ती ऐकत होती. काय बोलत होता शिरीष ?

 “ करुणे, रडू नकोस. ये, इकडे ये, करुणे !” पुन्हा शांत.“ करुणा, केविलवाणी करुणा? अरेरे !” पुन्हा शांत. शिरीष एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवर वळला. घोरू लागला. हेमा विचार करीत होती. करुणा ? कोण ही करुणा ? ईश्वराची का करुणा ? कोणाची करुणा ? करुणा का कोणाचे नाव आहे ? कोणा स्त्रीचे ? हेमा अस्वस्थ झाली.

 दुस-या दिवशी फिरायला गेली असता दोघे त्या पूर्वीच्या वृक्षाखाली बसली.

 “ हेमा, येथे तू लपली होतीस.”

 “ आणि करुणा कोठे लपली आहे?” "

 " देवाजवळ."

 “ शिरीष, करुणा कोण? तू काल झोपेत ‘ करुणे, करुणे, ये, रडू नकोस, ’ असे म्हणत होतास. ही कोण करुणा ? कोणाची ? काय पडले स्वप्न ? काय आहे हे सारे ?”

 “ हेमा, असंबद्ध स्वप्नात का काही अर्थ असतो ? पडलेल्या पाऱ्याचे कण जुळवणे कठीण, त्या प्रमाणे भंगलेल्या स्वप्नातून अर्थ काढणे कठीण.”

५४ * करुणा देवी