पान:करुणादेवी.djvu/49

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


 असे दिवस जात होते. हेमा आपल्याकडून शिरीषला आनंद व्हावा म्हणून सारखी झटे. तिने एक सुंदर पक्षी पाळला. सोनेरी पिंज-यात तो असे. त्याला ताजी रसाळ फळे घाली. त्या पाखराला तिने बोलायला शिकविले. काय शिकविले ?

 “ हसा हसा. रडू नका, रुसू नका, हसा, हसा. शिरीष, हस. हेमा, हस, सारी हसा. आनंदी राहा. देवाच्या राज्यात सुखी राहा.”

 शिरीष आला म्हणजे हेमा त्या पाखराला म्हणे, “ पाखरा, पाखरा, बोल, बोल.” की ते पाखरू बोलू लागे आणि शिरीषला खरेच हसू येई, हेमाही हसे.

 “ हेमा, तू सांगून कंटाळलीस म्हणून वाटते पाखराकडून मला सांगवतेस ?"

 “ परंतु पाखराचे तू ऐकतोस, हसतोस. मी किती सांगितले तरी तू हसत नाहीस.”

 “ हेमा, पाखरू मला हसवते परंतु ते रडत असेल.”

 “ का ?"

 “ ते कैदी आहे. पिंजऱ्यात आहे. ज्याने अनंत आकाशात उडावे त्याला ह्या एवढ्याशा पिंजयात पंख फडफडावे लागतात. त्याच्या पंखांची शक्ती मेली असेल. आता सोडलेस तरी त्याला उडवणार नाही. फार तर खुंटीवर बसेल. आणि पुन्हा पिंजऱ्यात येईल. अरेरे !”

 “ परंतु येथे त्याला संरक्षण आहे. रानात हजारो शत्रू.”

 “हेमा, परंतु बाहेर स्त्रातंत्र्य आहे. दुसऱ्याच्या संरक्षणाखाली सुरक्षित असे गुलाम म्हणून जगण्यापेक्षा ज्यात धोका आहे असे स्वातंत्र्य सहस्त्रपटीने बरे. पाखरा, माझ्यासाठी तू बंधनात पडलास.”

 “ सोडू का ह्याला ?”

 “ नको सोडू. इतर पक्षी त्याला मारतील. गुलामगिरीत जो जगला, गुलामगिरीत जो पेरू डाळिबे खात बसला, तो त्या स्वतंत्र पक्ष्यांना आवडत नाही. त्याची अवलाद वाढू नये, त्याने गुलामगिरीचे जंतू आणू नयेत म्हणून ते त्याला ठार करतात. आता राहू दे पिंजऱ्यात. एकदा गुलाम तो कायमचा गुलाम. पाखरा, डोके आपटून प्राण का नाही

सचिंत शिरीष * ५३