पान:करुणादेवी.djvu/48

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 “ काही तरी नाही. पुत्र नसेल तर सद्गती नाही. पितरांचा उद्धार होत नाही. कुळपरंपरा कोण चालवणार? तुमचे सेनाव्रत कोण चालवील ? तुमचे गुण का तुमच्याबरोबर मरू देणार ?”

 “ हेमा, मुले आपल्याचसारखी होतात असे थोडेच आहे ? कैकेयीच्या पोटी भरत येतो, हिरण्यकशिपूला प्रल्हाद होतो. नेमानेमाच्या गोष्टी. आपले चारित्र्य आपल्या पाठीमागून राहील. आपले गुण राहातील, आपल्या कृती राहातील; दुस-यांच्या जीवनात त्यांचा उपयोग होईल. आपण पुत्ररूपाने जगतो त्यापेक्षाही अधिक आपण आपल्या सत्कृत्यांनी मरणोत्तर जगत असतो. तू उगीच मनात आणू नकोस वेडे. वेडे आणि तुला एक सांगू का, मी माझ्या बाबांना उतारवयातच झालो ; कदाचित् देव अजूनही तुझ्या मांडीवर मूल देईल. कष्टी नको होऊ.”

 “ शिरीष, तुला एक गोष्ट सांगू ? ऐक. मधून मधून स्वप्नात मला बाळ दिसते. मी धावत त्याला उचलायला जाते इतक्यात एक सुंदर स्त्री तेथे येते व ती त्या बाळाला हात लावू देत नाही. ती स्वतःही ते उचलीत नाही व मलाही उचलू देत नाही. ते बाळ मग अदृश्य होते. कितीदा तरी असे स्वप्न पडते. काय रे ह्याचा अर्थ ? मी एका भविष्यवेत्त्यास विचारले. तेव्हा तो म्हणाला, तुम्हाला मूल होईल. शिरीष, आम्ही बायका हो. आम्हास आई होण्याहून अधिक आनंदाचे काय ?”

 “म्हणून तू माझे दुसरे लग्न लावीत होतीस वाटते ? सवत आल्यावर मूल होईल ह्या आशेने माझे दुसरे लग्न. होय ना हेमा ? इतकी त शिकलेली तरी ह्या भविष्यवेत्त्या कुडबुड्यांच्या शब्दांवर विश्वास कसा ठेवतेस ?"

 “ शिरीष, कधी कधी गोष्टी होतातही ख-या. ह्या दृश्य जगाहून खरे जग अनंत आहे. अनंत शक्ती, अनंत जीव ह्या विश्वब्रह्मांडात स्थूल नि सूक्ष्म रूपाने हिंडत आहेत. सर्वांचा एकमेकांवर परिणाम होत आहे.”

 “ आता मात्र पांडित्य दाखवू लागलीस खरी. मला व्यवहारी माणसाला हे तुझे गहन गूढ काही समजत नाही. ”  

“ शिरीष, जाऊ देत ही बोलणी. तू आनंदी राहा, हस, म्हणजे मी सुखी होईन, दुसरे काय सांगू ?”

५२ * करुणा देवी