पान:करुणादेवी.djvu/47

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 “ वेडी आहेस तू. हसून दाखवू ?”

 “ शिरीष, जीवन म्हणजे का नाटक ?”

 “ थोडेसे नाटकच. आपापले शोक, पश्चात्ताप, दुःखे सारे गिळून जगात वावरावे लागते. आपले खरे स्वरूप जगाला संपूर्णपणे दाखवता येत नसते. ते दाखवणे बरेही नव्हे. आपल्यालाही स्वत:चे संपूर्ण स्वरूप पाहायचा धीर होत नसतो. हे जग म्हणजे परमेश्वराचे मोठे नाटक. ह्या मोठ्या नाटकात आपण आपापली लहान लहान नाटके करीत असतो "

 “ शिरीष, तू आहेस मुख्य प्रधान. मला नाही समजत असली गहन गंभीर गूढे.”

 “ तू मुख्य प्रधानाची मुलगी आहेस. तू मागे एकदा मला अनुतीर्ण केले होतेस. तू माझ्यासाठीच देवीला नवस का केलास ते मला सांगता आले नव्हते.”

 “ शिरीष, तुला मी एक विचारू ?”

 " विचार."

 “ तू रागावशील. ”

 “ हेमा, मी तुझ्यावर एकदाच रागावलो होतो. दुष्काळात खीर केलौस म्हणून. एरवी कधी रागावलो होतो का? खरे सांग. तू मात्रः अनेकदा रागावली आहेस.”

 “ शिरीष, बायकांचा राग खरा का असतो ? पुरुषांच्या रागाची जशी भीती वाटते, तशी बायकांच्या रागाची वाटते का ? बरे, ते जाऊ दे. तुला एक विचारते हा.”

 “ विचार."

 “ मला अद्याप मूलबाळ नाही, म्हणून का तू दुःखी आहेस ? खरे सांग. होय ना ? पण मी काय करू ? शिरीष, तू दुसरे लग्न करतोस ? मला वाईट नाही वाटणार. मी पाहू तुझ्यासाठी सुंदरशी मुलगी ? हे काय ? रागावलास ?”

 “ काही तरी विचारतेस.”

सचिंत शिरीष * ५१