Jump to content

पान:करुणादेवी.djvu/46

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 " खरेच आहे. शिरीष म्हणजे एक रत्न आहे. त्यांनाच मी मुख्य प्रधान करतो. "

 काही दिवसांनी शिरीषला पंतप्रधानकीची वस्त्रे मिळाली. मोठा सत्कार झाला. राजधानीतही अनेक ठिकाणी सत्कार झाले.परंतु शिरीषला त्याचे काही वाटले नाही. तो नेहमीप्रमाणे गंभीर व उदास असे.

 “ शिरीष, तुम्ही मुख्य मंत्री झालेत म्हणून साऱ्या जगाला आनंद होत आहे. परंतु तुम्ही का दु:खी ? तुम्ही माझ्याजवळ मोकळेपणाने वागत नाही. मी का वाईट आहे ? काय माझा अपराध ? सांगा ना !”

 “ काय सांगू हेमा ! आईबापांची आठवण येते.”

 “ मग त्यांना तुम्ही येथे आणीत का नाही ? त्यांना भेटायला का जात नाही ? मी इतकी वर्षे सांगत आहे. परंतु तुमचा हट्ट कायम. येता भेटायला ? घेता रजा ? आपण दोघे जाऊ. ”

 “ आईबाप आता भेटणार नाहीत.”

  "कशावरून ? "

  “ ते ह्या जगात नाहीत. ”

 “ कोणी आणली ही दुष्ट वार्ता ?”

 “ मला स्वप्न पडले. त्यात आईबाप दूर गेलेले मी पाहिले. आणि अधिकाऱ्यांकडूनही खुलासा मागवून घेतला. माझे आईबाप गेले. अरेरे !”

 “ आपण त्यांच्या समाध्या बांधू.”

 “ त्यांना जिवंतपणी भेटलो नाही. आता मेल्यावर समाध्या काय कामाच्या ? आता अश्रूंची समाधी रोज बांधीत जाईन.”

 “ शिरीष, तुम्ही आनंदी राहा. ज्या गोष्टी आपल्या हातच्या नाहीत त्यासाठी रडून काय उपयोग ?”

 “ परंतु ज्या हातच्या असतात, त्या तरी माणसाने नकोत का करायला ?"

 “ ते तुम्ही करीतच आहात. साऱ्या राज्याची चिंता वाहात आहात. फक्त माझी चिंता तुम्हाला नाही. साऱ्या जगाला तुम्ही सुखविता आणि हेमाला मात्र रडवता. शिरीष, असे रे का ? माझ्याजवळच तू उदासीन का होतोस ?” .

५० * करुणा देवी