पान:करुणादेवी.djvu/41

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


 आणि खरेच नागोबा व वाघोबा आले. त्या दोन्ही समाध्या ते बांधू लागले. वाघाने दगडांवर आंग घासून घासून ते आरशासारखे गुळगुळीत केले. नागोबा लांब होई, मोज माप करी, अंगाचा गुण्या करी.

 “ नागोबा, कशा आकाराच्या बांधाव्या रे ?”

 “ वाघोबा, कमळाकृती बांधाव्या. अष्टपत्री बांधाव्या. जणू भूमातेच्या पोटातून वर आलेली सुंदर पाषाणमय कमळे.”

 मनोहर अशा दोन कमळाकार समाध्या बांधून नागोबा व वाघोबा गेले. त्या समाधींची वृक्षवेलींनी पूजा केली. वाऱ्याने स्तुतिस्तोत्रे म्हटली. त्या समाधींची निसर्गाने पहिली पूजा केली.

 उजाडले. दिशा फाकल्या. सूर्याचे प्रेमळ किरण अंगास लागून करुणा जागी झाली. जणू प्रेमळ पित्याने जागे केले. करुणा उठली. जणू स्वप्नसृष्टीतून उठली. तिचे हृदय आनंदाने, सुखाने भरून आले होते. जणू ती माहेरून आली होती. आईचा हात अंगावर फिरून आली होती.

 ती समोर पाहू लागली, तो त्या सुंदर समाध्या पूर्ण झालेल्या ! आजूबाजूस इवलीही घाण नाही. दगडधोंडा उरलेला नाही. मातीचा गारा पडलेला नाही. सारे स्वच्छ व सुंदर, ती अनिमिष नेत्रांनी समाध्यांकडे पाहात होती. खरेच का भूमातेने ह्या पुऱ्या केल्या ? तिने त्या समाधींस हात लाविला. तो त्या खऱ्या होत्या. स्वप्न नाही. भ्रम नाही.

 तिने त्या समाधीस प्रदक्षिणा घातल्या, आणखी रानफुले घेऊन आली. पिवळी, निळी, पांढरी फुले. वेलींच्या दोरात ती फुले गुंफून तिने माळा केल्या. त्या समाधीवर तिने त्या रमणीय माळा घातल्या. तिने भक्तिमय प्रणाम केला, आणि ती निघाली.

तिचे हृदय कृतज्ञतेने भरून आले होते. तिचे जीवन आनंदाने ओसंडत होते. कोणाला सांगू हा आनंद ? कोणाला दाखवू? हा आनंद मी एकटी कशी भोगू? शिरीष, कोठे रे आहेस तू? ये, ये. तुझा हात धरून तुला तिकडे नेते. परंतु शिरीष लांब लांब शेकडो कोस दूर होता.

 परंतु शिरीषचा मित्र आहे. प्रेमानंद आहे. करुणा प्रेमानंदाकडे प्रसन्न वदनाने निघाली. दु:खी कष्टी करुणा आज इतकी आनंदी का ते लोकांस कळेना. खी-पुरुष तिच्याकडे पाहात होते.

सासूसासऱ्यांची समाधी * ४५