भागून चांदण्यातच उशाला दगड घेऊन ती रानात निजे. चंद्र तिच्यावर अमृतमय किरणांची वृष्टी करी. वृक्ष तिच्यावर सुगंधी पुष्पांची वृष्टी करीत. आणि पहाटे वनदेवता मग हळूच तिच्या डोळ्यांना दवबिंदूंचे पाणी लावून तिला उठवी. पाखरे गाणी गात आणि करुणा माघारी जाई.
दगड बरेच जमा झाले. दोन लहानसे चबुतरे आता बांधता येतील, असे करुणेला वाटले. तिने एके दिवशी माती खणली. गारा तयार करण्यात आला. तिने माती तुडविली. मातीत भाताचा भुसा वगैरे तिने घातला होता. गारा पक्का होऊ दे.
आज रात्री समाधी बांधण्याचा आरंभ ती करणार होती. दोन्ही समाधींचा एकदम आरंभ. ती एक दगड सासऱ्याच्या समाधीसाठी लावी. दुसरा सासूच्या. दोन्ही समाध्या एकदम पुऱ्या झाल्या पाहिजेत. तोंडाने गाणे म्हणत होती. तन्मय झाली होती.
एका रात्रीत ते काम थोडेच पुरे होणार ! दोन तीन रात्री गेल्या. अद्याप समाध्या अपुऱ्या होत्या. दगड कमी पडणार वाटते ?
त्या रात्री करुणा सारखे ते बांधकाम करीत होती. दगड संपले. आज काम पुरे करायचेच, असे तिने ठरविले होते. ती दगड धुंडीत निघाली. सापडला की आणीत होती. परंतु थकली. त्या अपूर्ण समाधीजवळ ती घेरी घेऊन पडली ! कर्तव्यपरायण करुणा !
ती गाढ झोपेत होती, की बेशुद्ध अवस्थेत होती ! बेशुद्ध नाही. झोप आहे. श्वास चालला आहे. झोप हो, करुणे ! भूमातेच्या मांडीवर जरा झोप. धरित्रीआई तुझे काम पुरे करील. ती धावून येईल.
आणि खरेच धरित्रीमाता आली. मुलीच्या मदतीला आली. सीतादेवीला पोटाशी धरणारी धरित्रीमाता आली. करुणेच्या स्वप्नात धरित्रीमाता आली व म्हणाली, “ मुली, थकलीस हो तू. धन्य आहेस तू. तुझ्यासारखी कर्तव्यपरायण मुलगी मी पाहिली नाही. किती आजपर्यंत श्रमलीस, कष्टलीस. झोप हो तू, तुझ्या समाध्या मी पुऱ्या करविते. मी नागोबा व वाघोबा ह्यांना सांगते, की जा रे त्या समाध्या नीट बांधा. सुंदर बांधा. करुणे, तु सकाळी उठशील तो समाध्या बांधलेल्या असतील. चिंता नको करू. झोप जरा. माझ्या मांडीवर झोप.”