पान:करुणादेवी.djvu/42

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


 “ प्रेमानंद, ” करुणेने हाका मारल्या.

 “ काय करुणे ?”

 “ प्रेमानंद, आनंदाची वार्ता. मी त्या दोन समाध्या बांधीत होते ना. त्या अकस्मात रात्री पुऱ्या झाल्या. मला रात्री तेथे झोप लागली. स्वप्नात भूमाता आली व म्हणाली ‘रडू नको, नीज. माझे नागोबा व वाघोबा तुझे काम पुरे करतील.' प्रेमानंद, खरेच त्या पुऱ्या झाल्या आहेत. सुंदर समाध्या. येता बघायला ? चला."

 प्रेमानंद निघाला. गावात सर्वत्र ही बातमी गेली. सारा गाव निघाला, स्त्री-पुरुष, लहान-थोर सर्व निघाले. जणू यात्राच,होती. जणू मोठा उत्सवच होता. सर्व मंडळी त्या ठिकाणी आली. त्या सुंदर समाध्या पाहून सर्वांनी हात जोडले. सर्वांनी त्या समाध्यांवर फुलं उधळली.

 “ धन्य आहे ही करुणा, " असे सारे म्हणाले. करुणेचे कौतुक करीत गाव माघारा गेला. करुणा एकटीच हळूहळू धरी आली. ती एकटी बसली होती. आया-बाया आल्या. तिच्याभोवती जमल्या. तिची स्तुती करू लागल्या. ज्याच्यावर देवाची कृपा होते त्याच्यावर जगाची होते.

 करुणेला आता काही कमी पडत नसे. सावकाराने तिचे घर तिला दिले. मळा ज्याने घेतला होता त्याने तो परत दिला, कोणी तिला सुंदर रेशमी वस्त्रे भेट म्हणून आणून देत. कोणी अलंकार अर्पीत. कोणी बायका आपली मुले आणीत व तिच्या पायांवर घालीत. करुणा अंबरगावची जणू देवता बनली.

 परंतु देवता दुःखीच होती. देवतेचा देव कोठे होता ? शिरीष ! कोठे आहे शिरीष ? जुन्या बागेतील शिरीष वृक्षाची फुले घेऊन करुणा म्हणे, “फुलांना, सांगा रे शिरीष कोठे आहे तो. तुमच्यासारखाच तो सुकुमार आहे. प्रेमळ व कोमल आहे. परंतु आज का तो दगडासारखा झाला, लोखंडासारखा झाला ? शिरीष, ने रे मला. भेट मला. तू मला म्हणाला होतास, की तुझे प्रेम मला खेचून आणील. का बरे माझे प्रेम शिरीषला खेचून आणीत नाही ? माझे प्रेम कमी का पडते ? शिरीषाच्या फुलांनो,

४६ * करुणा देवी