पान:करुणादेवी.djvu/39

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 “ ती गेली. आता मलाही बोलावणे येईल. करुणे, तू जा. तुला देव आहे. शिरीष तुला भेटेल. निराश नको होऊ. मरणोन्मुख माणसाचा मनापासून दिलेला आशीर्वाद खोटा नाही होणार.” ते करुणेला म्हणत.

 एके दिवशी सकाळी उठून सूर्यनारायणाला नमस्कार करताना सुखदेवांचे प्राण देवाघरी निघून गेले. जरा छातीत कळ आली आणि स्रारे खलास.

 सासूसासरे, दोघे गेली. करुणा एकटी राहिली. ती कर्तव्यातून मुक्त झाली होती. जी शपथ तिने घेतली होती, ती तिने अक्षरशः पाळली होती. परंतु अद्याप एक कर्तव्य राहिले होते. शेवटचे कर्तव्य.

 त्या काळात मृतांच्या अस्थीवर लहानशी चार दगडांची समाधी बांधण्याची प्रथा होती. राजे-महाराजे प्रचंड समाध्या बांधीत. गोरगरीब चार दगड तरी उभारीत. जेथे मृतांना जाळले, पुरले, त्या जागेवर पाय पडू नयेत म्हणून ही व्यवस्था ! गावोगाव अशा लहानमोठ्या समाध्या दिसत असत. चबुतरे दिसत असत. कृतज्ञतेच्या त्या कोमल पवित्र खुणा होत्या.

 परंतु करुणा कशा बांधणार समाध्या? ती गरीब होती. राहाते घरही गहाण होते. कोठून मिळणार कर्ज ? मोलमजुरीतून कितीसे उरणार? ते किती पुरणार? अश्रूची बांधता आली असती, तर अमर समाधी तिने बांधली असती. मोत्यांसारखे अश्रू. परंतु त्यांची कशी बांधणार समाधी? अश्रूची आरसपानी समाधी हृदयांगणात बांधता येईल. परंतु जगाच्या आंगणात दगडाधोंड्यांचीच समाधी हवी.

 करुणेने निश्वय केला. दगडाधोंड्यांची समाधी बांधण्याचा तिने निर्धार केला. दिवसभर ती पोटासाठी काम करी. परंतु रात्री ती मोकळी असे. ती रात्री उठे, जंगलातून, रानातून हिंडे, सुरेख दगड गोळा करीत हिंडे. गुळगुळीत चपटे दगड. तिला भीती वाटत नसे. अस्वलालांडग्याची, तरसावाघाची तिला भीती वाटत नसे. भुताखेताची, खवीससमंधाची तिला भीती वाटत नसे.

 एखादा सुरेखसा दगड सापडला, की तिला आनंद होई. कधी कधी चांदणे असावे आणि त्या चांदण्यात करुणा दगड वेचीत हिंडे. थकून

सासूसासऱ्यांची समाधी * ४३