“ प्रेमानंद चार दिवसांत घासभरही अन्न मिळाले नाही. काल मला रात्री धान्य मिळाले. मी येत होते. चोरांनी ते लुटले. मी काय करू ? तुम्ही त्यांचे मित्र. काही मदत करा. तुमच्याजवळ मागायला संकोच वाटतो. परंतु इलाज नाही. माझे प्राण त्यांना खायला घालता आले असते, तर घातले असते. परंतु बोलून काय उपयोग ?”
“ करुणे, हे घे थोडे धान्य. आत खूप कोंडा आहे. तो पाखड. निघतील चार मुठी दाणे. ते त्या म्हाताऱ्याना शिजवून घाल हो. काळ कठीण आहे खरा. एकमेकांना शक्य तो जगवायचे. ”
ते भुसकट घेऊन करुणा घरी आली. पडवीत सूप घेऊन ते भुसकट ती पाखडू लागली. कोंडा उडत होता. दाणा मागे राहात होता. दाणे पाखडता पाखडता ती गाणे म्हणू लागली.
“ फटकं फटक फटक !"
सुपाचा आवाज होत आहे. कोंडा उडत आहे. निःसत्त्व क्षुद्र कोंडा उकिरड्यावर फेकण्याच्या लायकीचा कोंडा.
" फटक फटक फटकं !"
“ मीही ह्या कोंड्यासारखी आहे. दैव मला पाखडीत आहे. उकिरड्यावर मला फेकीत आहे. मी निराश आहे. मी दु:खी आहे. मी दुबळी, नि:सत्त्व आहे. मी कोणालाही नको. आईबाप मला सोडून गेले, पती मला सोडून गेला. सासूसासरे नावे ठेवतात. कोण आहे मला ? कोंडा, कोंडा. कोंड्यासारखे माझे जीवन. फुकट, फुकट.”
"फटक फटक्त फटक्र ! "
अशा अर्थाचे ते गाणे होते. करुण करुण गाणे. दाणे पाखडून झाले. ते तिने दळले. तिने त्या पिठाची पातळसर लापशी केली. सासूसासऱ्यास पाजली. त्यांनी प्रेमाने व कृतज्ञतेने तिच्याकडे पाहिले. किती तरी दिवसांनी इतक्या मायाममतेने त्या वृद्धांनी सुनेकडे पाहिले !
“ करुणे, धन्य आहे तुझी. तुझे ते गाणे ऐकून दगडालाही पाझर फुटेल. आम्ही तर माणसे आहोत. करुणे, तू कोंडा नाहीस. तू टपोरे मोती आहेस. मोलवान् पृथ्वीमोलाचे मोती. आम्हाला तुझी पारख झाली नाही. कोंबड्यांना कोंडा कळतो. मोती काय कळणार ? तुला आम्ही वाटेल