पान:करुणादेवी.djvu/35

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 “ यशोधर गादीवर आहेत, म्हणून तर इतकी व्यवस्था. सर्वत्र दुष्काळ, ते तरी काय करतील ? प्रधान शिरीष ह्यांनी दुस-या देशांतूनही धान्य आणण्यासाठी हजारो बैलगाड्या पाठवल्या आहेत. स्वतः यशोधरमहाराज एकदा चार घास खातात. प्रजा पोटभर जेवेल. त्या दिवशी मी पोटभर जेवेन असे त्यांनी राजधानीत जाहीर केले. राजधानीतील मोठमोठ्या अधिकाऱ्यांच्याही घरी दोन चार दिवसांना पुरेल इतकेच धान्य असते. महाराजांचे थोर उदाहरण सर्वासमोर आहे. तरी त्यांना तू नावे ठेवतेस ? पातकी आहेस !” तो अधिकारी म्हणाला.

 “ कृपा करा दादा. दुःखामुळे मी बोलल्ये. महाराज यशोधर पोटच्या पोराप्रमाणे प्रजेला जपतात. आणि म्हणून तर तुमच्यासमोर मी पदर पसरत्ये. तुम्ही महाराजांचे सत्त्व जाऊ देऊ नका. त्यांच्या नावास कलंक लावू नका. मी तुमची अनाथ मुलगी आहे.”

 लावलेले दुकान पुन्हा उघडून करुणेला चार पायल्या धान्य मिळाले. त्यांना दुवा देत ती निघाली. चार पायल्या धान्य मिळाल्यामुळे तिला आनंद झाला होता. तिच्या दुबळ्या पायांत त्या आनंदामुळे शक्ती आली होती. रस्त्यात अंधार होता. परंतु कर्तव्याचा प्रकाश तिला पंथ दाखवीत होता.

 परंतु कोण येत आहे ते अंधारातून ? चोर की काय ? होय. तो चोरच होता. त्याने एकदम करुणेच्या डोक्यावरचे पोते ओढले. करुणा चमकली. पोत्याची ओढाताण सुरू झाली. चोर ते घेऊन पळून गेला. करुणेची सारी शक्ती गेली. आता घरी त्या म्हाताच्यांना तोंड कसे दाखवायचे ? परंतु ती उठली. अंधारात तशीच निराशेने निघाली. घरी आली. ती दोन पिकली पाने फटकुरावर पडलेली होती.

 “ करुणे, मिळाले का काही ?” सासयाने विचारले. तिने सारी कथा सांगितली. त्या म्हाताऱ्याने सुस्कारे सोडले. तिने त्यांना घोटघोट पाणी पाजले. तीहीं पाणी पिऊन पडली.

 दुस-या दिवशी सकाळी ती प्रेमानंदाकडे गेली.

 “ काय करुणे, म्हातारी कशी आहेत ?”

दुःखी करुणा * ३९