Jump to content

पान:करुणादेवी.djvu/33

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

दोघांपुरते पीठ दळून ती उठली. तिने चूल पेटविली. म्हाताऱ्यास कढत कढत भाकर तिने वाढली. नंतर थोडा तुकडा खाल्ला.

 सासूबाई अलीकडे फार बोलत नसत. जणू त्यांनी मौन धरले. पूर्वी, शिव्याशाप, आता अबोला. परंतु करुणेला आता सर्व सवय झाली होती. सारे अंगवळणी पडले होते. येईल दिवस तो काढायचा असा तिने निश्चय केला होता.

 परंतु त्या वर्षी दुष्काळ आला. कित्येक वर्षात असा दुष्काळ पडला नव्हता. राजा यशोधराने ठायी ठायी असलेली सरकारी कोठारे मोकळी केली. लोकांना धान्य वाटले जाऊ लागले. राजाच्या धान्यागाराजवळ भाणसांची मुंग्यांसारखी राग लागे.

 गावोगावची पेवे उपसली गेली. सावकार, जमीनदार ह्यांनी कोठारे मोकळी केली. एकमेकांस जगवू असे सारे म्हणत होते. मोठी कठीण दशा. गायीगुरे तडफडून मरण पावू लागली. गुराना ना चारा ना पाणी. नद्या आटल्या. तळी आटली. लोक म्हणत समुद्रसुद्धा आटेल.

अंबर गावापासून कोसावर एक मोठा विहीर होती. तिला फक्त पाणी होते. अपरंपार पाणी. मुसळासारखे त्या विहिरीला झरे होते. तेथे माणसांची झुंबड होई. माणसे, गायीगुरे, पशुपक्षी ह्यांची गर्दी तेथे असे. करुणा लांबून घडा भरून घरी आणी.

 एकदा करुणा घडा घेऊन येत होती. वाटेत एक गाय पडली होती. तिला चालवत नव्हत. ती तहानली होती. त्या गोमातेने करुणेकडे पाहिले. करुणा कळवळलली, ती आपला घडा घेऊन गायीजवळ गेली. परंतु गायीचे तोंड घड्यात जाईना. इतक्यात करुणेला युक्ती सुचली. तिने एक दगड घेऊन हळूच वरचा भाग फोडला आणि रुंद तोंडाचा तो धडा गायीसमोर ठेवला. गाय पाणी प्यायली. शेवटचे पाणी. करुणेकडे प्रेमाने ब कृतज्ञतेने पाहात गोमातेने प्राण सोडले !

 “ घडा कसा फोडलास ?” सासूने विचारले.

 “ गायीला पाणी पाजण्यासाठी. ” तिने सांगितले.

 “ आम्ही इकडे पाण्यासाठी तडफडत होतो. तुला गायी-म्हशी आमच्याहून प्रिय. आम्हाला मारून तरी टाक. आणि तो घडा जुना

दुःखी करुणा * ३७