पान:करुणादेवी.djvu/32

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

चाकरी करीत आहेस तशीच कर. देव तुझ्यावर प्रसन्न होईल. तुझी तपश्वर्या फळेल. तू सुखी होशील. जा, नको रडू. मी सुखदेव व सावित्रीबाई ह्यांना सांगेन हो.”

 करुणा रानात गेली. मोळी तोडून दमली. एका ठिकाणी रडत बसली. तेथे तला झोप लागली. मोळीवरच डोके ठेवून ती निजली. तिला एक सुंदर स्वप्न पडले. शिरीष आपले अश्रू पुशीत आहे, केसात फूल खोवीत आहे. ‘ उगी, रडू नको, आता हस, ’ असे सांगत आहे असे तिने पाहिले, ऐकले. गोड मधुर स्वप्नात हसत होती. इतक्यात पाखरांचा एकदम किलबिलाट झाला. करुणा जागी झाली. पाखरांचा कलकलाट सुरू होता. काय झाले ? का घाबरली ती पाखरे ? कोणी पारधी तर नाही ना आला ? कोणी शिकारी तर नाही ना आला ? का त्या पाखरांना सर्प दिसला ? काय झाले ?

 तिला काही समजेना. तिने इकडे तिकडे पाहिले. नव्हता शिकारी, नव्हता साप. ती उठली. मोळी डोक्यावर घेऊन निघाली. ऊन मी म्हणत होते. तिचे पाय चट चट भाजत होते. तिने पळसाची पाने पायांना बांधली. मोळी घेऊन ती गावात आली. परंतु तिची मोळी कोणी विकत घेईना.

 “ करुणे, ये, तुझी मोळी मी विकत घेतो.”

 प्रेमानंदाचे ते शब्द होते. त्याने तिला दोन शेर दाणे दिले. मोळी टाकून करुणा घरी गेली.

 “ करुणे, आम्हाला का उपाशी मारणार आहेस तू ? किती उशीर !” सासू म्हणाली.

 “ सासूबाई, घरात दाणे नव्हते. तुम्हाला खायला तरी काय देऊ ? मी मोळी घेऊन आल्ये. परंतु कोणी विकतही घेईना. गावात हिंड हिंड हिंडले. शेवटी मोळी विकून हे दोन शेर दाणे आणले. आता दळते व देत्ये हो भाकरी करून. रागावू नका. भूक लागली असेल तुम्हाला. परंतु मी तरी काय करू ?"

 करुणेने दाणे पाखडले. ती दळायला बसली. ती थकलेली होती, परंतु तिला कोठला विसावा ?

३६ * करुणा देवी