पान:करुणादेवी.djvu/31

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

करुणा सासूबाईंचे रात्री पाय चेपीत होती. सासू एकदम ओरडली “नको चेपू पाय. तुझे हात लावू नकोस. तू माझा मुलगा दवडलास. तू तुझे आईबाप लहानपणी खाल्लेस आणि आम्हाला छळायला आलीस. तुला मूळबाळही होईना. वांझोटी, म्हणून गेला माझा बाळ. वैतागून गेला. हो चालती, कर तोंड काळे. सेवा करण्याचे सोंग करते सटवी. रानात जाते मोळी आणायला. रानात चोरून खात असशील, कोणाला मिठ्या मारीत असशील, नीघ. रडते आहे. झाले काय रडायला ? सोंगे करता येतात.”

 सावित्रीसासू वाटेल ते बोलली. करुणा अश्रु ढाळीत होती. ती पुन्हा पाय चेपू लागला. तो त्या वृद्ध सासूने लाथ मारली. अरेरे!

 करुणेचे आचरण धुतल्या तांदळासारखे होते. तरीही सासू नाही नाही ते बोलत असे. इतर सारी बोलणी करुणा सहन करी. परंतु पातिव्रत्यावर, सतीत्वावर टीका तिला खपत नसे. त्या रात्री तिला झोप आली नाही.

 एके दिवशी तो प्रेमानंदाकडे गेली.

 “ काय करुणा, काय काम ?” त्याने विचारले.

 “तुम्ही शिरीषचे मित्र. तुम्ही मला प्रतिज्ञेतून मोकळे करता का ? तुम्ही त्या दिवशी साक्षी होतेत. अत:पर जगावे असे मला वाटत नाही. सासूसासऱ्यांची मी सेवा करीत होते. पतीची आज्ञा होती. परंतु सासूबाई वाटेल ते बोलतात. माझ्या निर्मळ, निर्दोष शीलावरही शितोडे उडवतात.प्रेमानंद, मी इतर सारे अपमान गिळीत होते. मारहाण सहन करीत होते. परंतु प्राणाहून प्रिय असे पातिव्रत्य त्याच्यावरच प्रहार झाला तर मी कशी जगू ? तुम्ही त्यांचे मित्र. तुम्ही सासूबाई व मामंजी ह्यांची काळजी घ्या. मला जाऊ दे जगातून. दळभद्री, कपाळकरंटी मी. कशाला जगू ? पतीला दिलेल्या शब्दासाठी जगत आहे. प्रतिज्ञापूतिसाठी, घेतलेल्या शपथेसाठी जगत आहे. सांगा, कृपा करा. मला मुक्त करा.”

 “ करुणे, जग काही म्हणो, आपले मन शुद्ध असले म्हणजे झाले. आपलेच मन जर आपणास खात असेल तर गोष्ट निराळी. तू आपली शपथ पाळ. सूर्यनारायणाला डोळे आहेत. तो तुझ्या चारित्र्याकडे पाहात आहे. मानवांना घेऊ दे शंका, प्रभू घेणार नाही. समजलीस ? जा. सेवा

दु:खी करुणा * ३५