पान:करुणादेवी.djvu/3

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

गावात म्हणत असतात. त्या त्या गावच्या अधिकाच्यांनी अशी नोंद करून पाठवावी. आपण त्यातून निवड करून बोलावून घ्यावी. त्यांची परीक्षा घ्यावी. करून तर पाहू या.”

 “ करून पाहायला काहीच हरकत नाही. पुढील राजांसाठी ही उत्कृष्ट परंपरा राहील. खरोखरच आपण धन्य आहात. किती सारखा विचार करीत असता !"

 “ राजा होणे म्हणजे मोठी जोखीम. कोट्यावधी लोकांची सुखे राजावर अवलंबून असतात. एका कुटुंबाचा संसार नीट चालावा म्हणून त्या कुटुंबातील कर्त्या पुरुषाला किती दक्ष राहावे लागते. मग ज्याच्यावर लाखो संसार अवलंबून, त्या राजाने किती बरे दक्ष राहिले पाहिजे ? मघा ते वाद्य वाजत होते. माझ्या मनात विचार येई, की किती कुटुंबांतून सुखाचे संगीत नांदत असेल ? कोठे हाय हाय तर नसेल ना ? अन्याय नसेल ना ? जुलूम नसेल ना ? अन्नान्नदशा नसेल ना ? भांडणे, विरोध नसतील ना ? घरी-दारी सर्वत्र माझ्या राज्यात सर्वाचे संबंध प्रेममय व सहकार्याचे असतील का ? सर्वाचे भिन्नभिन्न सूर असूनही त्यांतून गुण्यागोविंदाचे संगीत निर्माण होत असेल का ? आदित्यनारायण, मी जेव्हा चांदीच्या ताटातून अमृतासारखे अन्न खातो, तेव्हा माझी प्रजा मला आठवते. मी सोन्याच्या पलंगावर परांच्या गाद्यांवर झोपतो, तेव्हा माझी प्रजा माझ्या डोळ्यांसमोर असते. मी जेव्हा माझा विशाल ग्रंथशाळेत हिंडतो, तेव्हा माझी प्रजा माझ्या डोळ्यांसमोर असते. मी मनोरम राजवाड्यातून वावरतो, तेव्हा, माझी प्रजा माझ्या डोळ्यांसमोर असते. प्रजेला अन्न, वस्र, घरदार, ज्ञान सारे असेल का, हा विचार रात्रंदिवस माझ्या डोळ्यांसमोर असतो. मी सुखात असता माझी प्रजा दुःखात असेल, तर देवाघरी मी गुन्हेगार ठरेन. एखादे वेळेस वाटते, की सोडावे राज्य, व्हावे संन्यासी व निघून जावे. परंतु अंगावरची जबाबदारी अशी सोडून जाणे, तेही पाप. म्हणून मी शक्य ती काळजी घेऊन हे प्रजापालनकर्तव्य पार पाडायचे असे ठरवले आहे. आपल्या बागेत जशी सुंदर सुगंधी फुले फुललेली असतात, तशी माझ्या प्रजेची जीवने फुलावी, त्यांच्या जीवनात रस व गंध उत्पन्न व्हावा असे वाटते. आपण माणसे

राजा यशोधर