पान:करुणादेवी.djvu/2

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.


नाव सर्वांच्या तोंडी झाले होते. मुक्तापूरची प्रचंड मंदिरे, भव्य राजवाडे, रुंद सुंदर रस्ते, तेथील भव्य बाजारपेठ, तेथील विद्यापीठ, तेथील न्यायमंदिर, सारे पाहाण्यासारखे होते. परंतु यशोधर राजाचे दर्शन व्हावे म्हणून लोक येत. तो पुण्यश्लोक राजा होता.

 यशोधराला एकच चिता रात्रंदिवस असे. प्रजा सुखी कशी होईल, हीच ती चिंता. एके दिवशी सुंदर सजलेल्या नावेतून तो शीतला नदीच्या शांत गंभीर प्रवाहावर विहार करीत होता. बरोबर मुख्य मंत्री आदित्यनारायण हा होता. एक वाद्यविशारद एक मधुर तंतुवाद्य वाजवीत होता. परंतु राजा यशोधर प्रसन्न नव्हता.

 “ महाराज, आज उदासीन का आपली चर्या ? सारी प्रजा सुखी आहे. मग का चिता ?” प्रधानाने विचारले.

 “ आदित्यनारायण, आपला राज्यकारभार दिवसेंदिवस अधिक चांगला व्हावा असे मला वाटते. राजा कितीही चांगला असला तरी त्याला जर अधिकारी चांगले मिळाले नाहीत, तर काय उपयोग? कायदा शेवटी कागदावरच राहातो. ठायी ठायी चांगली माणसे काम करण्यासाठी कशी मिळतील हा मुख्य प्रश्न आहे. प्रत्येक गावाला, तालुक्याला, जिल्ह्याला योग्य माणसे निवडली जातील, योग्य माणसे नेमली जातील म्हणून काय करावे ?”

 "परंतु हल्लीचे अधिकारी आहेत ते चांगलेच आहेत. तक्रार कोठून येत नाही.”

 “ माझ्या मनात एक योजना आहे. त्या त्या तालुक्यात जी बुद्धिमान, सद्गुणी अशी मुले असतील, त्या सर्वांना राजधानीत बोलवावे. त्यांना येथे वर्षभर शिक्षण देऊन त्यांची परीक्षा घ्यावी. केवळ बौद्धिकच परीक्षा नाही, तर इतरही अनेक अंगांची. आणि जी मुले जास्त योग्य ठरतील ती ठिकठिक्राणी नेमावीत,"

 “ परंतु त्या त्या ठिकाणची हुशार, शहाणी मुले मिळणार कशी ? समजायचा काय मार्ग ? ??

 “ त्या त्या गावच्या लोकांना माहीत असते. अमक्या अमक्याचा मुलगा फार हुशार आहे, फार शूर आहे, फार परोपकारी आहे, असे

६ करुणा देवी