पान:करुणादेवी.djvu/22

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


 हेमा एकदम मुकी झाली. मैत्रिणींबरोबर ती घरी आली. हेमा अलीकडे देवीच्या देवळात जाऊ लागली. फुलांचे हार नेई. देवीच्या गळ्यात घाली. हात जोडून मनोभावाने प्रार्थना करी. कसली प्रार्थना ? तिला काय कमी होते ?

 वर्ष संपत आले. त्या सर्व तरुण विद्याथ्र्याची परीक्षा झाली आणि परीक्षेत शिरीष पहिला आला. आपण उत्तीर्ण होऊ नये असे त्याला पूर्वी वाटे. आपण वेडीवाकडी उत्तरे देऊ असे त्याला पूर्वी वाटे, परंतु अलीकडे बाटत नसे. तो हुशार होताच. त्याने अभ्यास केला. त्याला फळ मिळाले.

 एके दिवशी पदवीदान-समारंभ झाला. स्वतः राजा यशोधर आला होता. त्याने उत्तीर्ण विद्याथ्याँस पदव्या दिल्या.शिरीषला त्याने सुवर्णपदक दिले. राजाने सर्व उत्तीर्ण विद्याथ्यास उद्देशून उपदेशपर भाषण केले :

 “ उत्तीर्ण तरुणांनो, देशातील बुद्धिमत्ता हाती यावी, देशातील सद्गुण दाती यावेत म्हणून ही परीक्षा होती. तुम्ही वर्षभर येथे होतात. तुमची वागणूक, तुमचे चारित्र्य येथे पाहिले जात होते. बौद्धिक गुणांबरोबरच तुमच्या हृदयाच्या गुणांचीही येथे पारख केली जात होती. अनेकांचे डोळे तुमच्या वतंनाकडे येथे होते. जे. तुम्ही उत्तीर्ण झाला आहात, त्यांना निरनिराळ्या कामावर हळूहळू नेमले जाईल. लक्षात ठेवा, की तुम्हाला प्रजेजी सेवा करायची आहे. जनता तुम्हाला पगार देणार, तुम्हास पोसणार. जनता तुम्हाला मान देईल, परंतु तुम्ही जनतेला मान द्या. ईश्वरासमोर एक दिवस झाडा द्यायचा आहे हे विसरू नका.”

 समारंभ संपला. उत्तीर्ण तरुण आनंदात होते. राजधानीतील सुखे भोगीत होते. इकडे तिकडे हिंडत होते, फिरत होते, परंतु शिरीष कोठे आहे ?

 तो शीतला नदीच्या तीरी बसला होता.

  ती पाहा हेमा आली.

 “ तुम्ही पहिले आलेत, होय ना ?”

 “ हो, आलो, ”

 “ तुम्हाला त्याचा आनंद नाही होत ?”

 “ माझ्या आईबापांना खरा आनंद होईल. ”

२६ * करुणा देवी