पान:करुणादेवी.djvu/18

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

बहुमोल वस्त्र ती नेसली होती. मोत्यांचे अलंकार तिच्या अंगावर होते. सारे तरुण तिच्याकडे पाहू लागले.

 चालक सामोरे आले.

 “ माझे बाबा इकडे आले होते ना ?” तिने विचारले.

  “ ते तर गेले.”

 “ इतक्यात कसे गेले ? ह्या तरुणांची परीक्षा घ्यायला ते आले होते ना ?”

 “ तसे काही बोलले नाहीत.”

  “ बरे, मी जात्ये.”

 “ थांबा. नोकर गेला आहे. माळ्याकडून फुले आणायला गेला आहे. फुलांची भेट घेऊन जा.”

 “ हे येथे इतके विद्यार्थी आहेत. त्यांना मी एक प्रश्न विचारू ?”

 "विचारा.”

 “तुम्ही सारे मोठी नोकरी मिळावी म्हणूनच आला आहात का ?”

 “हो, हो !” सारे म्हणाले.

 “ मला नको नोकरी !” एक आवाज आला.

 “ कोण म्हणतो, नको नोकरी ?” तिने विचारले.

 “ हा शिरीष !” सारे हसून म्हणाले.

 “ तुम्हाला नको नोकरी ?” तिने गंभीरपणे प्रश्न केला.

 "नको !” तो म्हणाला.

 “ का ?”

 “ मला खेड्यातच राहू दे. तेथे आईबापांची सेवा करू दे.”

 "आईबापांना येथे आणा“

 “परंतु नकोच. नोकरी नकोच.” हेमा निघून गेली.

 ते सारे तरुण विद्यार्थी शिरीषची थट्टा करू लागले.

 “ शिरीष, थोर आहे राजा तुझे नशीब.”

 “ राजाचा प्रधान होशील.”

 “ प्रधानाचा जाबई होशील.”

 अशी थट्टा चालली होती. परंतु शिरीष तेथे थांबला नाही. का नाही?

२२ * करुणा देवी