पान:करुणादेवी.djvu/17

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.


 "तुम्ही सांगाल ते मला मान्य आहे. तुमच्या सुखासाठी मो सारे करीन."

 " मग नाही येत माझ्याबरोबर?"

 "नको. एखाद्या तरुणावर, समजा, माझे प्रेम जडले आणि तो बुद्धिमान नसला तर? त्याला मग थोडेच येथे राहाता येईल? ते नंकोच. तुम्ही ज्याच्याशी लग्न लावाल त्याच्याशी मी आनंदाने संसार करीन.”

 "हेमा, मुलगी असावी तर तुझ्यासारखी. धन्य आहेस तू !"

 असे म्हणून आदित्यनारायण निघून गेले.

 विद्यापोठाच्या वसतिगृहात राज्यातील वेचक तरुणांची व्यवस्था करण्यात आली होती. त्यांचा विशिष्ट अभ्यास चालला होता. आदित्यनारायण मधून मधून ह्या वसतिगृहात येत व वरसंशोधन करीत असत.

 आज ते वसतिगृहात आले, तो काही तरी तेथे गडबड होती.

 "काय आहे ? काय आहे ?" आदित्यनारायण विचारत होते.

 "रस्त्यात एक लहान मूल होते. तिकडून एक मस्त हेला शिगे उगारून येत होता. परंतु येथील एक विद्यार्थी, शिरीष, विजेप्रमाणे धावत गेला व त्या मुलाला त्याने वाचवले. सारे त्याची स्तुती करीत आहेत." चालक म्हणाले.

 "कोठे आहे तो तरुण ?"

 " तो पाहा."

 शिरीषला तेथे बोलावण्यात आले. सुंदर सुकुमार शिरीष तेथे नम्रपणे उभा होता. तो सुकुमार असून वीर होता. फुलाप्रमाणे दिसत होता, परंतु वज्रवृत्तीचाही होता.

 "शाबास तुमची. महाराजांच्या कानांवर घातले पाहिजे.” आदित्यनारायण म्हणाले.

 "महाराजांच्या कानावर ह्यांची कीर्ती आधीच गेली आहे. ज्यांना खास दूत पाठवून आणण्यात आले, तेच हे शिरीष !” चालकांनी सांगितले.

 आदित्यनारायण निघून गेले आणि थोड्या वेळाने त्यांची मुलगी हेमा त्या वसतिगृहाकडे आली. सुवर्णासारखी तिची कांती होती. रेशमी

राजधानीत * २१