पान:करुणादेवी.djvu/19

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


 एके दिवशी हेमा शीतला नदीच्या तीरी मैत्रिणीसह हिंडत होती. शिरीषही नदीतीरी होता. शेकडो लोकांची जा- ये सुरू होती. शिरीष एकटाच तीरातीराने गेला व एका झाडाखाली बसला. तो शून्य दृष्टीने कोठे तरी पाहात होता ! त्माला का आईबापांची आठवण येत होती ? करुणेची आठवण येत होती ?

 ती पहा हेमा पळत पळत येत आहे.

 " काय झाले ? का पळता ?” शिरीषने विचारले.

 “ तुमच्याजवळ दोन शब्द बोलावे म्हणून.”

 “ त्यासाठी पळत येण्याची काय जरूरी ?"

 “ मैत्रिणींना चुकवण्यासाठी. हं, बोला. दोन शब्द बोला.”

 “ दहा शब्द झाले, ” तो म्हणाला.

 “ शब्दात पकडणे बरे नव्हे.”

 "मग कशात पकडाचे ?"

 “ प्रेमात पकडावे."

 “ मला काही समजत नाही.”

 “ तुम्ही तर सर्वात हुशार असे सारे म्हणतात.”

 "म्हणोत बिचारे, ”

  “ तुम्ही दु:खी का ? तुम्हाला घरची आठवण येते ? आईबापांची येते. होय ना ?”

 " होय."

  “ आणखी कोणाची ?”

 “ काय सांगू ? त्या पाहा तुमच्या मैत्रिणी आल्या."

 “ हे घ्या तुम्हाला फूल, कसले आहे ओळखा.”

 " माझ्या नावाचे."

  “ तुमचे नाव शिरीष वाटते?”

  “ विचारता कशाला ? तुम्हाला माहीतच आहे.”

  “ कोण म्हणतो माहीत आहे?”

 “ मी म्हणतो. माझे नाव माहीत नसते, तर हे फूल तुम्ही आणलेच नसतेत. आणि त्या दिवशी वसतिगृहात माझे नाव तुम्ही ऐकले होते.”

राजधानीत् * २३