बरं वाटलं. डॉक्टरांनी त्याला बरेच दिवस विश्रांती घायला सांगितलं, काही दिवस तर अंथरुणावरून उठायचीही बंदी केली. तिला वाटलं चारू या अनपेक्षितपणे उदभवलेल्या आजारानं आणि डॉक्टरांनी घातलेल्या बंधनांनी आणखीच खंतावेल. पण त्या मानानं तो उल्हसित राहिला.
विभा बराच वेळ गप्प राहिली तेव्हा विश्वजित म्हणाला, 'मग पुढं ?'
'पुढं काय? संपली गोष्ट.'
'ही जरा अपुरी आणि मधेच तोडल्यासारखी वाटते, नाही? एखाद्या मासिकात वगैरे आली असती तर काय बेकार शेवट आहे असं म्हटलं असतं.'
ती म्हणाली, 'त्याचं काय आहे, तुला ती एका राजाच्या (पुन्हा राजा आलाच) कोठाराची गोष्ट माहीताय ना? एक चिमणी आली, एक दाणा घेऊन भुर्र उडून गेली. एवढं सांगितलं म्हणजे बाकीची गोष्ट तुम्हाला समजल्यात जमा आहे. पुन:पुन्हा तेच तेच सांगण्यात काही हशील नाही, नाही का?'
तो गंभीरपणानं म्हणाला, 'तू निसटून जायला बघत्येयस, पण मी माझ्या प्रश्नाचं उत्तर घेतल्याशिवाय हलणार नाहीये.'
'मग राहा इथंच. शेजारी कुचकुच करायला लागले की माझी इज्जत राखण्यासाठी तू माझा नवरा आहेस असं सांगावं लागेल मला.'
'ही चेष्टेची वेळ नाही, विभा.'
'गेल्या काही वर्षात चेष्टेची वेळ नव्हतीच कधी.'
तिच्या विधानाकडे संपूर्ण दुर्लक्ष करून तो म्हणाला, 'तुझ्याच म्हणण्याप्रमाणे, परिस्थितीत काही बदल झाला नाही. मग तुझ्यात का झाला?'
'परिस्थितीत झाला नाही म्हणूनच.'
'कोड्यात बोलू नको, सरळ काय ते सांग.'
'तू इतका मद्दड आहेस की जे सरळ सोपं आहे ते तुला कोड्यासारखं वाटतंय. तू माझं आणि चारूचं आयुष्य तिसऱ्या माणसाला जितक्या जवळून पाहाता येईल तितक्या जवळून पाह्यलं आहेस. तुला चारू जितका माहीत आहे तितकीच मी माहीत झाले आहे. तुला असं वाटतं का की कोठारातलं धान्य संपेपर्यंत चिमणीची गोष्ट चालूच राहू शकेल म्हणून? समजा नातं सुरुवातीला अगदी हवंसं वाटलं म्हणून मी पत्करलं असलं तरी हळूहळू बदलत जाईल अशी अपेक्षा विचित्र आणि जगावेगळी आहे असं तू