म्हणू शकशील का? जेव्हा जेव्हा आपला ह्याबद्दल काहीही वाद झाला तेव्हा तुझा मुख्य भर एकाच मुद्यावर होता- चारूला तुझी गरज आहे. ती आहे म्हणूनच तर मी इतकी वर्षं त्याला चिकटून राहिले, अशा आशेवर की ती गरज हळूहळू कमी होत जाईल. चारूला माझी गरज आहे ती लहान मुलाची आईची गरज आहे. पण मुलाची निकोप वाढ झाली की त्याची गरज कमी होत जाते. मूल जर जन्मभर मूलच राहिलं, त्याची वाढच होऊ शकली नाही, तर त्याची गरज कधी संपणारच नाही. त्याच्या आईला कायम त्याच्या गरजेचं गुलाम होऊन राहावं लागेल.'
'मुलाच्या बाबतीत विशिष्ट परिस्थितीत आया अशी गुलामगिरी पत्करतातच ना? मग चारूसाठी तू ते का करू नयेस?'
'कारण तो माझा मुलगा नाही. नवरा आहे. त्याच्या जशा गरजा आहेत तशा माझ्याही आहेत. तो त्या पुऱ्या करू शकत नाही एवढंच नव्हे तर माझ्या काही गरजा असू शकतील ह्याची तो दखलही घेत नाही. तुला माहीताय विश्वजित, मला वाटायचं की चारू कमकुवत आहे, त्याला माझा आधार हवा पण क्रमाक्रमानं माझ्या लक्षात आलं की कमकुवत माणसंच खरी आक्रमक असतात, कारण ती इतरांकडून त्यांना हवं त्याची मागणी करतात आणि आपल्या कमकुवतपणाचंच हत्यार करून आपली मागणी पूरी करून घेतात. मला जेव्हा प्रथम कळलं की चारू ह्या माणसापर्यंत अजूनपर्यंत माझ्याखेरीज कुणीच पोचू शकलं नाही आणि मीच फक्त त्याला सुखी करू शकते, तेव्हा ही मला माझ्या सामर्थ्याची जाणीव वाटली. पण मी एकटीच त्याला सुखी करू शकते ह्याचा अर्थ मी ते केलं पाहिजे आणि ते करण्यासाठी माझी सगळी शक्ती खरचायला पाहिजे असा होता हे मला बरंच उशिरा कळलं.
'आईचं म्हणणं तिला अभिप्रेत नसलेल्या एका वेगळ्या अर्थानं खरं होतं. माणूस वेगवेगळ्या नात्यांत विभागला गेला की त्याच्या निरनिराळ्या गरजा निरनिराळी माणसं पुऱ्या करू शकतात. तो एकाच बिंदूपाशी एकवटला की त्या बिंदूला तो लेसर किरणांप्रमाणे जाळून टाकू शकतो.
'त्या बिंदूची जर जळायची तयारी असली तर त्यालाही हरकत नाही. पण माझी तशी तयारी नाही. मला इतर नात्यांतूनही जगायचं आहे. चारूनं माझा इतका संपूर्ण ताबा घेऊ पाहिला की मृण्मयची आई व्हायला सुद्धा मी उरायची नाही.'
पान:कमळाची पानं (Kamalachi pan).pdf/99
Appearance
हे पान प्रमाणित केलेले आहे.
कमळाची पानं । ९९