पान:कमळाची पानं (Kamalachi pan).pdf/97

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

दिलेली ऑर्डर फोन करून कॅन्सल करायला लावली. हा चारूला फार मोठा अपमान वाटला.
 मग एकदा ट्रकमध्ये भरण्यासाठी कोंबडी खत ढीग करून ठेवीत होते त्यात मुद्दाम माती नि खडे मिसळताहेत असं चारूला दिसलं. त्यानं मुकादमाला हटकलं तर मुकादम गुर्मीत म्हणाला, 'सगळं बड्या साहेबांच्या हुकमानं होतंय, त्यांना काय ते विचारा.'
 सरदारजी म्हणाला, 'अरे यार, हा बिझिनेस आहे. हे खताचं गिऱ्हाईक म्हणजे मोठी पार्टी आहे. त्यांची ऑर्डर हातातून जाऊ द्यायची नाही म्हणून खूप कमी कोटेशन दिलं. दिलेल्या कोटेशनमध्ये माल पुरवणं अर्थातच परवडणार नाही. मग काय करणार?'
 'म्हणून काय धडधडीत माती न खडे मिसळायचे?'
 'फक्त ठराविक प्रमाणात. नाहीतरी केजेसमधलं खत गोळा करताना त्यात खालची माती, खडे थोडे येतातच. ह्यात थोडे जास्त. कुणाला कळणाराय? इतर सगळे ह्याच क्वॉलिटीचं खत देतात. त्यात आपणच लबाडी करतोय असं नाही.'
 चारूला पटलं नाही.एक तर आपल्या पाठीमागे जाऊन सरदारजीने मुकादमाला डायरेक्ट ऑर्डर्स दिल्या ह्याचा त्याला राग आला. म्हणजे मुकादम त्याची काय पत्रास ठेवणार? आणि दुसरं असले लांडीलबाडीचे व्यवहार स्टाफच्या संगनमताने केले म्हणजे स्टाफकडे आपली काय पत उरली
 असंच काही काही होत राहिलं आणि चारूचं मन नोकरीतनं उडालं. तो खिन्न, उदास झाला. त्याचं जेवण कमी झालं. तो घरी आला की फारसं न बोलता नुसता बसून राहायचा.
 'चारू तुला काही होतंय का?'
 'काही नाही. कुठं काय?'
 असा नुसता बसून का राहतोस?'
 'काय करू मग?'
 'काहीतरी वाच, माझ्याशी बोल, मृण्मयशी खेळ.'
 असं तिनं म्हटलं की तो उठून बाहेर जायचा नि उशीरापर्यंत परत यायचाच नाही. त्याला नीट झोप लागायची नाही आणि सकाळी उठून कामावर जायचीही शक्ती नसल्यासारखं वाटायला लागलं. शेवटी त्याला कावीळ झाल्याचं निष्पन्न झालं. त्याच्या अशा वागण्याला खास कारण होतं हे ऐकून एकप्रकारे विभाला

कमळाची पानं । ९७