विभा म्हणाली. 'हा माझ्यावर दबाव आणण्याचा प्रकार होता.
'असं कसं तू म्हणू शकतेस?'
'नाही तर काय? चारूनं आतापर्यंत पुष्कळ भोगलंय, आता तू त्याला आणखी दु:ख देऊ नको असं तू मला अप्रत्यक्षपणे सांगत नव्हतास का?'
'समजा असलो तरी त्यात गैर काय होतं?'
'गैर होतं असं तुला वाटत नाही हे उघड आहे, कारण आज पुन्हा तीच भूमिका घेऊन तू माझ्याकडे आला आहेस.'
चारू हिंडताफिरता झाला, कामावर जायला लागला आणि त्याच्या सरदारजीशी कुरबुरी सुरू झाल्या. इन्क्युबेटर्स विकत घ्यायचे होते. एका कंपनीच्या मालाचा दर्जा जरा कमी होता, शिवाय किमती जास्त होत्या. त्यांनी सरदारजीला आणि चारूला रोख कमिशन देऊ केलं होतं. चारूनं दुसऱ्या कंपनीला ऑर्डर दिली. सरदारजीनं त्याचा निर्णय उचलून धरला नाही.
चारू म्हणाला, 'पण सर, त्यांच्या किमतीही जास्त आहेत.'
'मूर्ख आहेस. ते जेवढे पैसे कॅशमध्ये आपल्याकडे वळते करणार ते वजा घातले तर किमती जास्त नव्हत्या ना?'
'नाही, दुसऱ्या कंपनीइतक्याच होत्या.'
'मग त्यांच्याकडून माल घेऊन काय फरक पडला?'
"फरक एवढाच की आपल्याला त्याच किमतीत जास्त चांगली क्वॉलिटी मिळतेय, आणि पुन्हा सगळा व्यवहार खुला नि प्रामाणिक राहतोय.'
'तू इतका बावळट असशील असं मला वाटलं नव्हतं.' क्वॉलिटी म्हणजे काय थोडं फिनिशिंग वगैरे कमी दर्जाचं आहे एवढंच ना? ती मामुली बाब आहे. पण त्या कंपनीकडून माल घेण्यात आपल्याला बरीच मोठी रक्कम मिळतेय हे तू विसरू नकोस. हिशेबात मिळालेल्या रकमेच्या दुप्पट किंमत गैरहिशेबी रकमेची असते. पुन्हा बिलावर जास्त किंमत लागल्याचा फायदा टॅक्समध्ये मिळतो. म्हणजे तुझ्या त्या प्रामाणिक व्यवहारापेक्षा सगळ्या तऱ्हेनं ह्यात जास्त फायदे होतात.'
चारूनं स्वत:ला मिळणारं कमिशन लाथाडलं ह्यात सरदारजीला प्रामाणिकपणापेक्षा मूर्खपणाच दिसला. सगळ्यात कळस म्हणजे त्यानं चारूला