राहायला आले. पण तो त्यांना भेटायला गेला नाही.
'आज ते कुठं आहेत ते त्याला किंवा तो कुठं आहे ते त्यांना ठाऊक तरी आहे की नाही मला शंका आहे.' विश्वजित म्हणाला.
बऱ्याच वेळाच्या स्तब्धतेचा भंग करीत विभा म्हणाली, 'खरंच का रे त्याची काकू अशी असेल?'
'तुझाही विश्वास बसत नाही?'
एखादी बाई एका लहान मुलाशी विनाकरण इतका दुष्टपणा करील हे विश्वास ठेवायला कठीण आहे.'
'मग एका चवदा-पंधरा वर्षांच्या मुलानं हे सगळं नाटकच रचलं आणि स्वार्थापायी आईबापांचा आधार कायमचा तोडून एकटेपण पत्करलं ह्यावर विश्वास ठेवायला जास्त सोपं जाईल का?'
'अर्थातच नाही. रागावू नको.'
काही वेळापूर्वी मी रागावत नाही म्हणून तू तक्रार करीत होतीस.'
'वेड घेऊन पेडगावला जाऊ नकोस.'
'नव्हतीस का करीत?'
'माझ्या तक्रारीचा तसा अर्थ नव्हता. बरं, आता एक सांग मला. तुझ्यात नि, चारूच्यात काय देणंघेणं आहे? तुला का त्याच्याबद्दल इतकं वाटतं?
'त्याचा काका म्हणजे माझा बाप.'
'ओ माय गॉड.'
'हं.'
बराच वेळ ही माहिती पचवून झाल्यावर ती म्हणाली, 'हे तू मला अगोदरच सांगायला पाहिजे होतंस.'
'त्यानं काय फरक पडला असता?'
'ते कुणास ठाऊक पण तू फसवाफसवी केलीस.'
'मी तुला सांगितलेल्यातलं एक अक्षरही खोटं नाही, शपथेवर सांगतो.'
'खोटं दोन तऱ्हांनी सांगता येतं, एक म्हणजे सत्याचा विपर्यास करून दुसरं म्हणजे काहीतरी महत्त्वाची माहिती हातची राखून.'
समर्थन करण्याचा प्रश्न नाही असं तू म्हणाला होतास, पण ही तुझी गोष्ट मी चारूच्या वागण्याचं समर्थन म्हणून स्वीकारावी असाच तुझा हेतू होता,'