पान:कमळाची पानं (Kamalachi pan).pdf/90

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 ती म्हणाली, 'किती बारीक झालायस चारू. खाण्यापिण्याचे हाल करून घेतले असशील ना मी नसताना?'
 आपण नसलो की त्याची आबाळ होते, आपण त्याच्या अस्तित्वाला आवश्यक आहोत हा विचार तिला सुखावून गेला.
 घरी आल्या-आल्या त्याच्या मिठीत शिरून इतक्या सगळ्या दिवसांचा उपास सोडायचं स्वप्न ती रंगवत होती, पण घराच्या अवकळेनं तिचा विरस केला. सगळीकडे बोटभर धूळ, छताला जळमटं, स्वैपाकघरात खरकटी भांडी, मोरीत कपड्यांचा ढीग, बिछाना अस्ताव्यस्त, चादरी चुरगळलेल्या, मळलेल्या.
 ती म्हणाली, 'चारू, हे काय? कामवाली बाई येत नव्हती का?'
 'तिची न् माझी वेळ जमायची नाही. मग मी तिचा नाद सोडून दिला.
 'किल्ली द्यायचीस तिच्याजवळ.'
 'नाही दिली खरी. म्हटलं ती कितपत विश्वासू आहे कुणास ठाऊक.'
 ह्यानंतर वाद घालण्यात अर्थच नव्हता. ती पदर खोचून साफसफाईला लागली. तिनं चारूकडे मदत मागितली नाही, त्यानं ती देऊ केली नाही. इकडे तिकडे अपराध्यासारखा बिनबोलता वावरत होता, त्यानं विभा जास्तजास्तच चिडत होती. ताण वाढत चालला होता.

० ० ०

 विभा म्हणाली, 'त्या दिवशीच्या स्फोटापासून तू वाचवलंस. तू आलास त्या वेळी आला नसतास तर काय झालं असतं ते सांगणं कठीण आहे. कदाचित आज जे घडलंय ते त्या वेळीच घडलं असतं. ते घडलं ह्याबद्दल तुला दुवा द्यावा की शिव्या द्याव्या मला कळत नाही.'
 'शिव्या का म्हणून?'
 'कारण हा मधला जो काळ गेला तो निरर्थकच ठरला.'
 विश्वजितनं आल्या आल्या परिस्थितीचा अंदाज घेतला आणि तो कामाला लागला.
 'विभा. तुझ्याकडे उंच झाडू नाही का ही कोळिष्टकं काढायला?'
 'एक फडकं दे ना धूळ झटकायला.'
 'मृण्मय रडतोय बघ. तू जा बघू त्याच्याकडं. मी आवरतो ती भांडी.'
 चारू त्यांच्यात नव्हताच. निस्तेज नजर शून्यात लावून तो बसला होता.विश्वजितनं त्याला हाताला धरून खुर्चीवर आणून बसवलं. जेवण वाढल्यावर,

कमळाची पानं । ९०