पान:कमळाची पानं (Kamalachi pan).pdf/72

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

इतके दिवस तिला हे सगळं सहन करावं लागलं नसतं.'
 'मग आता काय करायला पाहिजे?'
 'आता ऑपरेशनच केलं पाहिजे. आणि तेही शक्य तितक्या लवकर.'
 'तुम्ही कराल ना डॉक्टर?'
 'हो. पण पैसे बरेच लागतील. त्यापेक्षा असं करा, तिला सरकारी दवाखान्यातच ॲडमिट करा म्हणजे...'
 'पैशाची काळजी नका करू डॉक्टर.' श्रीपती थोडा रागावून बोलला. त्याला अजून नक्की काय झालंय ते समजलंच नव्हतं.
 त्यानं जेव्हा राधेला हे सांगितलं, तेव्हा तिला कायकाय वाटून गेलं हे तिच तिलाच माहीत. ती रडरड रडली. पण श्रीपती स्वत:च इतका हबकून गेला होता की तिचं सांत्वन कसं करायचं त्याला समजतच नव्हतं. डॉक्टराच्या सांगण्यावर त्याचा विश्वास बसत नव्हता. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा राधाला ऑपरेशन थिएटरमध्ये नेलं तेव्हाही त्याला सारखं वाटत होतं की डॉक्टरांची काहीतरी चूक झालेली असणार.
 ऑपरेशन संपेपर्यंत त्यानं स्वत:ची अशी ठाम समजूत करून घेतली हाेती की सगळं ठीक होईल. पोटात मूलच असणार, पण ते नेहमीसारखं जन्मू शकत नसल्यामुळे डॉक्टरांना ऑपरेशन करावं लागलं असणार. त्यानं अशा गोष्टी पूर्वी ऐकल्या होत्या.
 जेव्हा डॉक्टरांनी त्याला बोलावलं. तेव्हा तो आत गेला. डॉक्टर त्याच्यासाठीच थांबले होते. त्याला राधा कुठेच दिसली नाही. पण डॉक्टर मात्र कशाकडे तरी कौतुकानं बोट दाखवत होते.
 'ते पाहिलंस का? आम्ही बाहेर काढलं ते तुझ्या बायकोच्या पोटातून काळजी करू नको. आता ठीक आहे ती.'
 टेबलावर एका जर्मनच्या ताटलीमध्ये तो गोळा होता. खाटकाच्या दुकानात आणलेलं काही तरी असावं तसा तो दिसत होता. श्रीपती त्या गुलाबी-जांभळ्या गोळ्याकडं सुन्नपणे बघताना जमिनीला खिळला होता. अजून त्यात प्राण असल्यासारखा वाटत होता. त्याच्या शेजारी त्याचं वजन आणि परीघ सांगणारं एक कार्ड ठेवलं होतं. जणू काही एखाद्या भाजीपाल्या प्रदर्शनातला कंदच होता तो!
 हेऽऽहे राधेच्या पोटात? आपल्या बायकोच्या पोटात? नाही नाही शक्य नाही. कोणी तरी क्रूर गंमत करतंय ही. त्याच्या मेंदूमध्ये सणाण् कळा येत

कमळाची पानं । ७२