पान:कमळाची पानं (Kamalachi pan).pdf/58

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

दिला नाही कुणाला. विरोध होईल अशी कल्पना असली पाहिजे तिला. तीन-चार वर्षांनी जेव्हा तो परत आला न् तिला लग्नाची मागणी घातली तेव्हा सगळ्यांना धक्काच बसला. हे लग्न व्हावं असं कुणालाच वाटत नव्हतं.
 'का?'
 'म्हणजे केवळ तो एक परदेशी म्हणून नव्हे. तो तिला कोणत्याही बाबतीत अनुरूप नव्हता म्हणून. तिचा बाप प्रसिद्ध इतिहाससंशोधक, आई शिक्षणतज्ञ, भाऊ हार्टस्पेशालिस्ट, स्वत: रोमा सुन्दर, हुशार, एसस्सीला पहिल्या पन्नासात आली. पुढे सायन्स टॅलंट स्कॉलरशिप मिळवून बी. एस्सी. करीत होती. तिच्याबद्दल फार अपेक्षा होत्या सगळ्यांच्या. काही म्हणून अशक्य नव्हतंच तिला. तिच्या मानाने तो अगदीच सामान्य माणूस. शिक्षण मध्येच सोडलेला. काही महत्त्वाकांक्षा म्हणून नाही, स्थैर्य नाही. नुसता इकडून तिकडे भटकणारा. काय तिला त्याच्यात दिसलं काही समजत नाही. मी तर म्हटलं पोरगी गोऱ्या कातडीला भुलली.'
 'रोमला कुठे नोकरी शोधायला गेला?'
 'काय सगळंच अजब. म्हणे त्याच्या आईचं आजोळ इटलीतलं आहे. त्या लोकांना भेटायला म्हणून गेला. आवडलं रोम की राहिला तिथेच. ह्या अमेरिकनांना कुठे काही पाळंमुळं नसतातच. भटके निव्वळ.'
 'मग रोमा काय करत्येय आता?'
 'काही नाही. इथल्या सगळ्यांनी सांगितलं की तिथे शिक्षण तरी चालू ठेव. शिकलेलं सगळं वाया घालवू नको. पण पालथ्या घड्यावर पाणी. शास्त्रीय संशोधन करणार होती म्हणे ती.' त्यांनी पुस्ती जोडली, शेवटी बायका त्या बायकाच. एक नवरा मिळाला की ह्यांच्या आयुष्याच सार्थक झालं. मग जन्मभर काही न करता घरी बसायचं लायसेन्स मिळतं ह्यांना.'
 असल्या विधानांना विरोध करण्यात अर्थ नसतो म्हणून मी काहीच बोलले नाही. त्यांनीही मुद्याची गोष्ट सांगून रोमापुराण आटपलं. मुद्दा असा की रोमाच्या सध्याच्या परिस्थितीबद्दल त्यांना फारशी कल्पना नव्हती. ती पत्रं लिहायची पण तोटकी. तेव्हा मी तिला जाऊन भेट्रन आले आणि आयविटनेस रिपोर्ट दिला तर त्यांना हवा होता.
 'आम्हाला सगळ्यांना तिची जरा काळजी वाटते,' ते म्हणाले. 'तिचा नवरा हा असला. नोकरी ही धर, ती धर, आज आहे, उद्या नाही. बरं दुकानातल्या सेल्समनला असा किती पगार मिळत असणार? आणि पोरगी

कमळाची पानं । ५८