पान:कमळाची पानं (Kamalachi pan).pdf/57

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 आणि मग त्यांनी दिलेलं पत्त्याचं चिठुरडं डोळ्यांखालून घातलं. वाटलं, हा योगायोग जरा अतीच झाला. मी विचारलं 'ती तिथे जन्मलेली वगैरे आहे की काय?'
 'छे हो, तीच तर गंमत आहे. तिथे जाऊन राहीपर्यंत तिचा रोमशी काडीइतकाही संबंध नव्हता.'
 'काय करते तिथे?'
 'तिचा नवरा तिथे असतो.'
 एफेओ, वकिलात, बहुराष्ट्रीय कंपनी असं काहीतरी मनात आणून मी म्हटलं, 'कसली नोकरी आहे?'
 'आहे कसल्याशा डिपार्टमेन्टल स्टोअरमध्ये.'
 'म्हणजे?'
 'त्याचं असं आहे तो आपल्या इकडला नाही.' आपल्या इकडला असता तर डिपार्टमेन्टल स्टोअरमध्ये कशी नोकरी केली असती असं त्यांनी ध्वनित केलं.
 'असं? इटालियन आहे की काय?'
 तो आहे अमेरिकन. पण त्यांची गाठ पडली इथंच पुण्यात.'
 एव्हाना सावधपणा गुंडाळून ठेवून मी त्यांची गोष्ट औत्सुक्यानं ऐकायला लागले होते.
 ते म्हणाले, 'तो काही वर्षांपूर्वी पुण्याला आला होता. पेशवेकालीन पुणे की अशा काहीतरी विषयावर अभ्यास करीत होता. रोमाचे वडील त्याला मार्गदर्शन करीत होते. त्यांच्या घरी रोमाची न् त्याची ओळख झाली मग ती त्याला पुणं दाखवायच्या निमित्ताने त्याच्या बरोबर हिंडली. तो त्यांच्या घरीही येऊन जाऊन असे. पण ही स्वारी रोमाच्या प्रेमात पडलीय म्हणून काही कुणाला पत्ताही लागला नाही.'
 'रोमालासुद्धा?'
 ती चवदा-पंधरा वर्षांची होती त्यावेळी. तिला काय पोरीला?'
 चवदा-पंधरा वर्षांच्या मुलींबद्दलच्या त्यांच्या कल्पनेला धक्का न देता मी विचारलं, 'बरं मग?'
 'मग वर्षभरानं हा परत गेला. पण रोमाचा नि त्याचा नियमित पत्रव्यवहार चालू होता. इथे सगळे आपले तिचा पेनफ्रेंड म्हणून त्याच्याकडे पाहात होते. पण पत्रापत्रीतनंच त्यांचं जमलं असलं पाहिजे. रोमानं काही सुगावा लागू

कमळाची पानं । ५७