पान:कमळाची पानं (Kamalachi pan).pdf/59

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मानी आहे. आपल्याला काही उणं आहे असं आपल्या तोंडानं सांगायची नाही. कळलं तरी इथून काय मदत करणार म्हणा. पण निदान तुम्ही तिला भेटून आला तर तेवढंच बरं वाटेल.'
 मला जरा राग आला. असं सांगितलं म्हणजे नाही म्हणणं अवघड जाणार हे त्यांना पक्कं माहीत होतं. पण माझ्याकडे असलेल्या अत्यंत मर्यादित वेळातला काही ह्या कामाला द्यायची हमी घेणं माझ्या जिवावर आलं होतं.
 मी म्हटलं, 'जमलं तर भेटेन. आधी मी तिथं फक्त ४-५ दिवस आहे. त्यातून अनोळखी शहर. आपल्याला भाषा येत नाही. तेव्हा पत्ता बित्ता शोधून काढणं-'
  'हवं तर तुम्हाला एअरपोर्टवर भेटायला कळवतो तिला.'
 'नको नको, तशी काही गरज नाही.' मी घाईघाईनं म्हणाले, 'तिला कशाला उगीच त्रास? मी सवड काढून तिला भेटेन, तुम्ही काळजी करू नका.'
 शेवटी असं जवळजवळ कबूल केल्यावर सुटका झाली. तिच्यासाठी सामान न्यायचं मात्र मी साफ नाकारलं, कारण अजूनही तिला भेटण्याचा माझा फारसा इरादा नव्हता. पण हातात गाइडबुक आणि नकाशा घेऊन प्रेक्षणीय स्थळं शोधत रोममध्ये हिंडत असताना माझा नकाशा चुकला आणि मी नेमकी रोमाच्या रस्त्यावर उपटले. मग मात्र मी म्हटलं ह्यात काही तरी दैवी इच्छा वगैरे प्रकार दिसतो आहे. बघू या तरी ही रोमा कोण आहे कशी आहे.
 रस्त्याचं नाव जरी गोंडस असलं तरी तो भाग फारसा पॉश दिसत नव्हता. अस्वच्छ रस्ते, जुनाट इमारती, मध्यमवर्गीयांच्या खिशांना परवडतील अशी हॉटेलं, झगमगीत न दिसणारी दुकानं, बाल्कन्यांत कपडे वाळत घातले होते. रस्त्यात मळकी मुलं खेळत होती. मला हव्या असलेल्या बिल्डिंगच्या दारात एक बाई लठ्ठ गालांचं मूल कडेवर घेऊन उभी होती. समोर एकजण हेल काढीत त्या मुलांचं कौतुक करीत होती.
 बिल्डिंग मध्ये लिफ्ट नव्हतीच. तीन जिने चढून रोमाच्या फ्लॅटपर्यंत पोचले. दार उघडलं ती मुलगी भारतीयच आहे असं काही छातीठोकपणे सांगता आलं नसतं. रंग सावळा असला तरी इटालियनांत खपून जाण्याइतका. केस खांद्यापर्यंत कापलेले. मोकळेच. पेहराव विटकी घट्ट बसणारी ब्ल्यू जीन आणि टीशर्ट. पायांत बारीक वाद्यांचे रोप-सोल्ड सँडल्स. युरोपात इकडे तिकडे

कमळाची पानं । ५९