सांगशील. हा सगळा तुझ्याच मनोविकृतीचा खेळ आहे झालं!
मुक्ता : तू माझ्यावर विश्वास ठेवतेस की नाहीस याच्याशी मला काही कर्तव्य नाही. पण तुला पुरावाच हवा असेल तर ह्या किल्ल्या घे. बाबांच्या खोलीतलं गोदरेजचं कपाट उघड. त्यात त्यांची पुस्तकं आहेत. ती माझीच कशावरून नाहीत अशी शंका तू काढशील. पण त्यांच्यावर विकत घेतल्याच्या तारखा आहेत. बाबांच्या अक्षरात टीपासुद्धा आहेत. काही काही अगदी मासलेवाईक आहेत. तुला वाचायला गंमत वाटेल.
(बोलताबोलता ती किल्ल्या टेबलावर टाकते. सीमा त्यांच्याकडे बघते पण त्या उचलत नाही. तिचे डोळे विस्फारलेले. चेहरा ताठ. मुक्ता काय सांगते त्यावर अनिच्छेनं तिला विश्वास ठेवावा लागतो आहे आणि त्यामुळं ती हादरली आहे.)
पद्मा : तुला केवढं सहन करावं लागलं याची आम्हाला कल्पनाही नव्हती. तू कधी काही बोलली कसं नाहीस?
मुक्ता : बोलून काय उपयोग होता? शिवाय बाबांनी माझ्याकडून वचन घेतलं होतं ह्या प्रकाराची कुठं वाच्यता करणार नाही म्हणून.
सीमा : (धक्क्यातून ती थोडीफार सावरली आहे. मुक्ताशी बोलण्याचा तिचा सूर प्रथमच थोडा आदरयुक्त आहे.) पण हे तू तोंड दाबून सोसलंस कसं? माझ्याच्यानं असं करवलंच नसतं. (थोडा वेळ ती गप्प राहाते. तिच्या मनात येणारे विचार अस्वीकार्य आहेत. ते झटकून टाकण्याच्या आविर्भावात ती मान हलवते.) शी:! तुला सगळ्या प्रकाराची किळस नाही यायची?
मुक्ता : (आश्चर्यानं) किळस? खरं म्हणजे नाही यायची. मी त्यांच्याकडे हा एक परिपूर्ण माणूस आहे, माझा बाप आहे, अशा नजरेनं बघतच नव्हते. माझ्या लेखी ते मेलेलेच होते. फक्त काही शरीरव्यापार चालू होते एवढंच!
दीना : असं होतं तर मग तू एखादी नर्स का नाही ठेवलीस त्यांचं सगळं करायला?
मुक्ता : नर्सची तशी काही गरज नव्हती. एक गडी यायचा दिवसातून दोनदा. तो त्यांना स्पंज करायला, त्यांचा बिछाना करायला मदत करायचा. बाकी सगळं माझ्यानं सहज उरकायचं. उगीच नर्सवर पैसे कशाला खर्च करायचे?
दीना : पैशाची अडचण असती तर मी पाठवले असते. मला का नाही कळवलंस?