पद्मा : पैशाची अडचण असायचं काही कारण नव्हतं. शेअर्स वगैरेंपासून बाबांना बरंच उत्पन्न होतं. शिवाय हे एवढं मोठं घर होतं, त्यातलं भाड्यानं देता आलं असतं.
मुक्ता : पैशाची अडचण नव्हतीच. (मुद्दाम सावकाश नि प्रत्येक शब्दावर जोर देत) फक्त जे पैसे होते ते विनाकारण खर्च करून टाकायचे नव्हते. बाबा गेल्यावर माझ्या पुढल्या आयुष्याची बेगमी करायला साठवून ठेवायचे होते. (पद्माकर तिच्याकडे चमकून बघतो. ती त्याच्याकडे पाहून जराशी हसते.) मला माहीत आहे पद्मा, बाबांच्या इस्टेटीवर तुझी आशा होती ते.
पद्मा : मुळीच नव्हती.
मुक्ता : मग उत्तमच. कारण बाबांनी जे काही मागं ठेवलंय त्यातला दमडीही तुम्हा कुणाला मिळणार नाही. ते सगळं आता माझं आहे.
(पद्माकर एकदम उठून खिडकीशी जातो व बाहेर बघत पाठमोरा उभा राहतो)
सीमा : (रागानं) बाबांच्या इस्टेटीवर आपला सगळ्यांचा सारखाच हक्क आहे.
मुक्ता : कोणाचाही कुणावर हक्क असणं हा परस्परसंबंध आहे, सीमा. ज्याला तुझ्यावर हक्क सांगण्याची मुभा आहे, त्याच्यावरच तू हक्क सांगू शकशील
सीमा : बाबा माझ्यावर कसा हक्क सांगू शकले असते? माझं लग्न त्यांना पसंत नव्हतं. श्री डोळ्यांसमोर आलेलासुद्धा त्यांना खपत नव्हता. मग मला त्यांना आपल्या घरी कसं नेता आलं असतं?
मुक्ता : मी कारणाबद्दल बोलतच नाहीये, फक्त परिणामांबद्दल बोलत्येय तुमचं वागणं सर्वस्वी समर्थनीय होतं असं आपण एकवेळ धरून चालू पण म्हणून जबाबदारीतला वाटा तुम्ही टाळलात हे तर तुम्हाला नाकारता येणार नाही? मग आता इस्टेटीतला वाटा कोणत्या तोंडानं मागता?
सीमा : कायद्यानं द्यावाच लागेल.
मुक्ता : त्याची तुला काळजी नको. बाबांनी रीतसर मृत्युपत्र करून सगळं माझ्या नावानं ठेवलं आहे. आणि त्यांची सगळी इस्टेट त्यांनी स्वतःच मिळवलेली असल्यामुळं ती कुणालाही ठेवण्याचा त्यांना पूर्ण अधिकार होता.
सीमा : अस्सं! आता कळलं तुझी सहनशीलता कशापोटी होती ते. तुझा डाव होता तर पहिल्यापासून. बाबांचं मन आमच्या विरूद्ध भरवून.....
मुक्ता : तसं करण्याची काही जरूर पडली नाही मला. (एकदम अवखळपणे