Jump to content

पान:कमळाची पानं (Kamalachi pan).pdf/24

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

नयेत. मग शरीर असल्या सवयींचा गुलाम बनतं. पण अलीकडे सगळंच बदललं होतं. जिभेचे लाड करावेसे वाटायचे. आज हे कर, उद्या ते कर म्हणून सांगायचे. केलेला पदार्थ अधाशासारखा खायचे. तसंच अंग चेपून द्यायला सांगायचे. चेपता चेपता दमून थांबले की कां थांबलीस म्हणून विचारायचे.
 दीना : बिचारी!
 मुक्ता : आणि लैंगिक वाङ्म़य वाचायचा छंद लागला होता त्यांना. पहिल्यापासूनच असला पाहिजे, पण ते चोरून वाचत असावेत. आता अगदी उघडपणे चालायचं. बाकी अंथरूणाला खिळलेला माणूस चोरून काय करू शकणार? - अश्लील वाङ्म़याचा मोठा संग्रह होता त्यांच्याकडे.
 सीमा : मग त्यात काय झालं? सगळ्याच पुरुषांना वाचायला आवडतं ते.
 मुक्ता : (तिच्या बोलण्याची दखल न घेता) ते वाचायचं नि त्याबद्दल चर्चा करायची ही त्यांची सगळ्यात आवडती करमणूक. मला म्हणायचे, मुक्ते! तुझी आई फार चांगली बाई होती. फार चांगली. फक्त ह्या एका बाबतीत ती मला सुख देऊ शकली नाही. मी सदा अतृप्तच राहिलो.
 सीमा : (हलक्या आवाजात) खोटं आहे हे सगळं!
 मुक्ता : (पुन्हा तिच्याकडे संपूर्ण दुर्लक्ष करून) पुढंपुढं डोळ्यांचं ऑपरेशन झाल्यानंतर त्यांना वाचायला दिसेना तेव्हा माझ्याकडून वाचून घ्यायचे. तांबड्या पेन्सिलीनं खुणा केलेले पॅसेजेस होते तेवढेच वाचायला सांगायचे न् मग त्याबद्दल बोलत सुटायचे.
 दीना : माय गॉड, माय गॉड!
 मुक्ता : जागेपणी थोडातरी तोल राखून बोलायचे. झोपेच्या औषधांच्या अमलाखाली असले की असं काही विचकट बरळायचे की अंगावर काटा उभा राह्यचा.
 सीमा : (त्वेषानं) साफसाफ खोटं आहे सगळं. मी बाबांच्या जवळ राहात नसेन पण अधूनमधून भेटत तर होते. मला कसं हे कळलं नाही?
 पद्मा : मीसुद्धा महिन्यातनं एकदा तरी चक्कर टाकून जात होतो. मला नाही त्यांचा तोल सुटलेला दिसला कधी.
 मुक्ता : मी सोडून इतरांसमोर ते फार जपून बोलायचे. दुसरं कुणी आलं की पुस्तकं लपवून ठेवायला सांगायचे. बाकी सगळं गेलं तरी तेवढा कावेबाजपणा उरला होता त्यांच्यात.

 सीमा : आता बाबांची साक्ष काढणं शक्य नाही, तेव्हा तू काय वाटेल ते

कमळाची पानं । २४