दीना : आणखी थांबून तरी काय करायचंय? शिवाय मला फार रजाही मिळाली नाहीये.
सीमा : खरं म्हणजे मी पण जावं म्हणत होते उद्या-परवा.
पद्मा : सगळ्यांनीच जाऊन कसं चालेल? अजून माणसं येताहेत दुखवट्याच्या भेटीला. अिथं कुणीच नसलं तर ते बरं दिसणार नाही.
(सगळे एकदम मुक्ताकडे बघतात, मग स्तब्धता. वरील संभाषण चालू असता मुक्ता चहा कपात ओतून एकेकाला कप देते. पद्माकरचं बोलणं संपल्यावर ती शेवटचा कप घेऊन त्याच्या समोरच्या खुर्चीत बसते. तिच्या हालचाली झटपट पण यांत्रिक. खाली बसल्यावर इतर सगळे एकदम गप्प झाले आहेत याची जाणीवच नसल्यासारखी ती एकटक समोर बघत चहाचे घुटके घेते.)
दीना : बाकी लोक मात्र खूप लोटताहेत हं. मला वाटलं नव्हतं.
पद्मा : का वाटलं नव्हतं? (भाषण पाठ म्हटल्यासारखं) मराठी वृत्तपत्रांच्या जगात बाबांचं एक विशेष स्थान होतं. पक्षीय राजकारणापासून अलिप्त राहून समाजाला सत्प्रेरणा देण्यासाठी झटणारे गेल्या पिढीत जे काही चारजण होते, त्यांच्यात बाबांचा मान सर्वांत मोठा होता. (हे आपण पाठ केलेलं भाषण म्हणून दाखवल्यासारखं बोलतो आहोत याची जाणीव होऊन एकदम जरासं हसतो.) तू विसरलास.
दीना : विसरेन कसा? पण तरी लोकांना इतकं वाटेल याची कल्पना नव्हती. आफ्टर ऑल गेली कित्येक वर्ष बाबांचा सार्वजनिक जीवनाशी काही संबंध नव्हता.
सीमा : लोकांना खरं कितपत वाटतं कुणास ठाऊक! आपलं रीत आहे म्हणून भेटायला येतात. तेचतेच बोलतात, आणि आल्यापासून घड्याळाकडे नजर. किती वेळ बसलं म्हणजे जायला हरकत नाही याचा विचार करीत.
मुक्ता : (कप टेबलावर ठेवून एकदम उठून उभी राहाते.) तुमच्यासारखाच.
(यापुढील संपूर्ण संभाषणात स्टेजवर फक्त तिच्याच हालचालींची आपल्याला प्रामुख्यानं जाणीव होते. ती येरझारा घालते, एकदम थांबते. खिडकीशी उभी राहून बाहेर बघते. परत येऊन खुर्चीवर बसते. तिची नर्व्हस एनर्जी व तिच्या अंगावरचा भडक कपडा आपलं लक्ष तिच्यावरच केंद्रित करतात.)
दीना : मुक्ता!
मुक्ता : बाबा जिवंत असेपर्यंत नुसतं तोंडदेखलं भेटण्यापलिकडे त्यांच्यासाठी काही केलं नाहीत तुम्ही. ते मेल्यावर कशासाठी जमलात? स्वत:ची लाज