राखायला? त्यांना मिळणाऱ्या मोठेपणात आपणही जरा न्हाऊन घ्यावं म्हणून? की त्यांच्या इस्टेटीसाठी?
सीमा : (रागानं) तोंडाला येईल ते काय बरळत्येयस? डोकं ठिकाणावर आहे ना तुझं?
मुक्ता : (हसून) नसावंच बहुतेक. तुमच्यासारखं माझं डोकं ठिकाणावर असतं तर बाबांची जबाबदारी अंगावेगळी टाकून कधीच मोकळी झाले असते.
सीमा : (जाणूनबुजून उपरोधानं) आणि मोकळी होऊन काय केलं असतंस?
मुक्ता : तुम्ही सगळ्यांनी केलं तेच. स्वत:चा संसार थाटला असता. स्वत:साठी जगले असते.
पद्मा : पण तुला- (एकदम थांबतो.)
मुक्ता : का थांबलास? वाक्य पुरं कर ना. पण तुला कुणी पत्करली असती, असंच ना? काय कुरूप बायकांची लग्नं होत नाहीत पद्मा?
पद्मा : (काकुळतीनं) तसं म्हणायचं नव्हतं ग मला
सीमा : मग असलं कुणी तुला पत्करणारं तर आता कर ना लग्न. आता कोण आडवं येतंय तुला?
मुक्ता : आता फार उशीर झाला. चान्स निघून गेला.
दीना : (त्याच्या आवाजात एकदम हळूवारपणा आला आहे.) म्हणजे, असं कुणी होतं तुझ्या आयुष्यात?
मुक्ता : होता एकजण.
दीना : मग काय झालं?
मुक्ता : होणार काय? बाबांना भीती वाटत होती, मुक्ताचं लग्न झालं तर आपल्याला कोण सांभाळणार म्हणून. त्यांनी फार हुशारीनं विल्हेवाट लावली त्याची. अगदी थोड्या वेळात त्याला घाबरवून पळवून लावलं. मग मला म्हणाले, असल्या बुळ्याशी लग्न करणार होतीस तू? माझ्यावर रागावण्याऐवजी माझे आभार मानले पाहिजेस तू, तुला त्याच्या तावडीतून सोडवलं म्हणून:
दीना : पण असं केलं तरी काय बाबांनी त्याला घाबरवून सोडायला!
मुक्ता : घाबरवलं म्हणजे काही खुनाची धमकीबिमकी नाही दिली. त्याला भेटायला बोलावलं. (ह्यापुढचं भाषण ती कुणाकडे न बघता, स्वप्नात असल्यासारखं बोलते. जे घडलं होतं ते ती पुन्हा जगते आहे असा तोंडावर भाव.) विचारलं, तुला मुक्तेशी लग्न का करायचंय? असा काही प्रश्न विचारला जाईल अशी अपेक्षा नव्हती म्हणून तो अडखळतच म्हणाला, मला ती आवडते.