हजेरी घ्यायला तुला मोकळीक आहे, दीना! पण तू इथं असतास तर हेच केलं असतंस. आम्हाला आमचे संसार आहेत, मुलंबाळं आहेत, परगावाहून वरच्यावर इथं येणं शक्य नव्हतं. मुक्ताला दुसरं काहीच नव्हतं. आणि ती सगळं करायला खंबीर होती.
पद्मा : हं. ती खंबीर होती म्हणून तर तिच्यावर सगळं टाकणं सोपं गेलं आम्हांला. कधीकधी वाटायचं, की इथं येऊन राहाणं शक्य नसलं तरी बाबांना थोडे दिवस आमच्याकडे घेऊन जावं. पण विमल ते कबूल करीना. ती म्हणे, सगळं बिनबोभाट होतंय तर तुम्ही का उगीच अंगावर ओढून घेता? मला माझा संसार पुरे झालाय, आणखी आजारी माणसाचं करायची शक्ती नाही मला. मग मी स्वत:ची समजूत करून घेई की विमलनं आदळाआपट करून अनिच्छेनं बाबांचं करण्यापेक्षा त्यांच्या स्वत:च्या मुलीनं प्रेमानं केलेलं बर! बाबांना भेटायला आलो न तिला पाहिलं की लाज वाटायची मला स्वत:ची. खरं म्हणजे मी थोरला भाऊ. बाबा तिच्या लग्नाच्या बाबतीत काही हालचाल करीत नाहीत असं पाहून मी पुढाकार घ्यायला पाहिजे होता; पण मी स्वार्थी होतो. मला स्वत:पलिकडचं बघता आलं नाही.
दिना : आता काय करणार आहे ती?.
पद्मा : (दचकून) मुक्ता? मला नाही माहीत. मी काही विचारलं नाही तिला त्याबद्दल. (ह्या प्रश्नानं त्याला अस्वस्थ केलं आहे हे उघड आहे.)
सीमा : करील काहीही. आपल्याला काय करायचंय त्याच्याशी? तिची ती मुखत्यार आहे.
(मुक्ता चहाचा ट्रे घेऊन डावीकडच्या दारातून येते. दीनानाथ तिला पाहून चटकन उठतो व तिच्या हातातला ट्रे घेऊन सोफ्यासमोरच्या टेबलावर ठेवतो.
मुक्ता तिशीची. लठ्ठ माणसांत जमा होण्यासारखी. खूप तेल चोपडलेल्या केसांची घट्ट वेणी. तंग बसणारं पांढरं, पातळ कापडाचं पोलकं व त्याच्या दंडात रुतणाऱ्या बाह्या तिचा बेढबपणा आणखीच स्पष्ट करतात. साडी भडक प्रिंट असलेली, तिला अगदी विशोभित दिसणारी.
ती आल्यावर अपराधी शांतता. मग सीमा एकदम 'ब्राअिट' आवाजात बोलते.)
सीमा : तुझ्या रिझर्व्हेशनबद्दल काही कळलं का दीना?
दीना : हो, सोमवार सकाळची फ्लाइट मिळाली आहे.
पद्मा : म्हणजे परवाच की! इतक्यात निघालाससुद्धा तू?