आडव्या आठ्या. मी आयुष्यात हरलो आहे, फसलो आहे असा भाव तोंडावर. वय चाळिशीतलं पण पस्तिशीच्या आसपास असलेल्या सीमा व दीनानाथापेक्षा तो खूपच वयस्कर वाटतो.
दीना : काय दशा झालीय नाही घराची? पूर्वी बाबांना मोठा अभिमान असायचा आपण घर किती उत्तम स्थितीत ठेवतो याचा. नेहमी म्हणायचे, आपले लोक वास्तू बांधण्यावर लाखावारी खर्च करतील, पण ती मेंटेन करण्यासाठी दमडी नाही सुटायची त्यांच्या हातून.
पद्मा : गेली काही वर्षं त्राण होतं कुठं बाबांना घराकडे लक्ष द्यायला? मुक्ताचं सगळं पाहायची.
सीमा : अन् मुक्ताचा कारभार सदाचाच गबाळग्रंथी!
पद्मा : असं म्हणू नको. बाबांची उस्तवारी करण्यात वेळच झाला नसेल तिला दुसऱ्या कशाकडे बघायला.
दीना : खरंच. कुणालाही हेवा वाटणार नाही असं हे गेल्या काही वर्षांचं आयुष्य गेलं बिचारीचं. तसे तुम्ही होतात म्हणा, पण मुख्य जबाबदारी तिच्यावरच होती. (येऊन सीमाशेजारी सोफ्यावर बसतो.)
पद्मा : मुख्य नाही, सगळीच. कधीकधी एखाद्या कैद्यासारखं वाटत असलं पाहिजे. आजाऱ्याच्या तैनातीत रात्रंदिवस राहायचं म्हणजे सोपी गोष्ट नाही. (सुस्कारा टाकून) सुटली बिचारी! भेटायला येणारे म्हणतात, इतक्या थोर माणसाची शेवटची सेवा तुमच्या हातून घडली, सुदैवी आहात तुम्ही. कसली सुदैवी? लोक काही विचारच करीत नाहीत बोलताना. (थोडं थांबून) तिच्यावर एकटीवर सगळी जबाबदारी टाकली म्हणून कधीकधी फार अपराध्यासारखं वाटायचं मला.
सीमा : मला नाही वाटायचं. मुक्ताला मदतीची गरज वाटली असती तर मागितली असती तिनं. ती अशा ताठ्यात वागायची की जणू बाबा म्हणजे तिच्या खास मालकीची एक वस्तू होती.
पद्मा : तू तिच्या वागणुकीचा विपरीत अर्थ लावते आहेस. (खिन्नपणे) मला वाटतं, मदत मागितली तरी मिळणार नाही याची तिला कल्पना होती म्हणून तिनं मागितलीच नाही.
दीना : म्हणजे, बाबांच्या आजारपणात तुम्ही काहीच हातभार लावला नाही?
सीमा : तू सोयिस्करपणे अमेरिकेत जाऊन राहिलास, तेव्हा आमची