पान:कमळाची पानं (Kamalachi pan).pdf/171

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 रणजितचं पिणं वाढतच होतं. एक दिवस ती त्याला म्हणाली, "तुम्हाला शेतीतली माहिती आहे तर तुम्ही जमीन खंडानं घेऊन शेती का करीत नाही?"
 "आम्ही इथे पिढ्यान्-पिढ्या मोठे जमीनदार आहोत. मी खंडानं जमीन घ्यायची म्हणजे माझी पत काय राहिली?
 "उलटं लोक मानतील तुम्हाला."
 "अनू, तू काय बोलतेस तुला कळत नाही. ज्या गोष्टी समजत नाहीत त्यांत तू पडू नको."
 कधी तिला वाटायचं, मी तरी कशासाठी ही धडपड करतेय? असल्या जगण्यात काही अर्थ आहे का? एखादवेळी कधी तरी मध्यरात्री जागा होऊन तो पहायचा की ती रडतेय. मग तो तिला मिठीत घेऊन तिची समजूत घालायचा आणि पुन्हा दारूला न शिवायची शपथ घ्यायचा, पण तो ती शपथ पाळणार नाही हे तिलाही माहीत होतं नि त्यालाही.
 एक दिवस शिल्पा तिच्याकडे आली. "ये शिलू, किती दिवसांत भेटली नाहीस. कधी आलीस माहेरी? लग्न मानवलेलं दिसतंय तुला. किती छान दिसत्येयस."
 चहा घेता घेता शिल्पा म्हणाली, "तू का अशी ओढल्यासारखी दिसतेस? अनू, रडतेस तू? काय झालं? गेल्या वेळी भेटलीस तेव्हा आनंदात दिसलीस."
 "आनंदाला ग्रहण लागायला काही वेळ लागत नाही."
 "पण झालं तरी काय?"
 अनुजाने तिला सगळं सांगितलं. म्हणाली, "काय करावं कळेनासंच झालंय मला."
 "तू त्याला व्यसनमुक्ती केंद्रात का नाही घेऊन जात?"
 "आधी त्यांनी यायला पाहिजे. आणि समजा व्यसन सुटलं तरी पुढे काय! धंदा-नोकरी काही करायचंच नाही म्हटलं की पुन्हा ते त्याच मार्गाने जाणार."
 "प्रयत्न तर करून बघ. कदाचित तिथे वेगळ्या माणसांत जाऊन त्याला काही वेगळा दृष्टिकोन मिळेल. मी त्या केंद्राचा फोन नंबर काढून तुला देते. तू त्यांच्याशी बोलून दिवस ठरव."
 मुख्य अडसर होता तो म्हणजे आपल्याला व्यसन आहे आणि ते सोडायची गरज आहे हेच कबूल करायला रणजित तयार होईना. तो म्हणे मी अधनंमधनं

कमळाची पानं । १७१