पान:कमळाची पानं (Kamalachi pan).pdf/172

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

थोडी दारू प्यायलो तर कुणाचं काय वाईट होतंय?
 "अधूनमधून नाही, जवळ जवळ रोज पिता आणि त्यामुळे आपलं दोघांचंही वाईट होतंय."
 "काय वाईट होतंय? मी काय तुला वाईट वागवतो का मारहाण करतो?"
 "मारहाण करणं म्हणजेच वाईट वागवणं का? जरा विचार करा, रणजित. लग्न झाल्यानंतरचे दिवस आणि आत्ता ह्यात तुम्हाला काहीच फरक जाणवत नाही? आपण एकत्र फिरायला जात होतो, चेष्टामस्करी करीत, रेंगाळत जेवत होतो, रात्री उशीरापर्यंत गप्पा मारीत होतो. आता एखादं काम उरकल्यासारखं जेवण करून तुम्ही लगेच झोपायला जाता. मी आवराआवर करून येते तो तुम्ही गाढ झोपेत असता. फिरायला तर आपण किती दिवसांत गेलो नाही.
 "तू घरी कुठे असतेस?"
 "मी रोज तुम्ही यायच्या आत घरी आलेली असते."
 "मग कुणी ना कुणी दुकानात आलेलं असतं."
 "बास? एवढंच?"
 "म्हणायचंय काय तुला? लग्नानंतरचे हनीमूनचे दिवस जन्मभर टिकतात का?"
 लग्नानंतर ३-४ दिवस तो रानात गेला नव्हता, आणि तिनं का म्हणून विचारलं तेव्हा म्हणाला होता, आपला हनीमून नाही का?
 आता ती म्हणाली, "तुमच्याशी वाद घालण्यात अर्थ नाही, कारण तुम्ही मुद्दाम वेड पांघरताय. मी तुम्हाला फक्त एवढंच सांगते अशा तऱ्हेनं जगणं मला अशक्य आहे. हे असंच चालू राहिलं तर तुम्हाला सोडून जाणं एवढा एकच मार्ग मला आहे."
 "का म्हणून सोडून जाणार? तुझं माझ्यावर प्रेम नाही?"
 "खूप प्रेम आहे. म्हणूनच तुमचं वागणं आणि त्यामुळे आपल्या नात्याचं जे होतंय ते सहन करणं मला शक्य नाही. तुमच्याशी लग्न करण्यात मी फार मोठी चूक केली. ती आता निस्तरली पाहिजे."
 "चूक केली असं कसं म्हणतेस?"
 "सरळ आहे. माझ्याशी लग्न केल्यामुळे तुमचं सुरळित चाललेलं आयुष्य विस्कटलं. ते परत रुळावर आणण्यासाठी जे करायला पाहिजे ते करायला तुम्ही तयार नाही. तुम्ही तुमच्या चौकटीतून बाहेर पडायलाच मागत नाही.

कमळाची पानं । १७२