पान:कमळाची पानं (Kamalachi pan).pdf/169

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

नेहमीप्रमाणे शेतावर गेला तेव्हा तिथल्या मुकादमाने त्याला त्याच्या भावाचा निरोप सांगितला. भावाने त्याला ह्यापुढे शेतीची कामं पहायला, शेतावर यायला सुद्धा बंदी केली होती.
 तो तिरमिरीने भावाकडे गेला. "दादा हा काय प्रकार आहे?"
 "मग, तुला काय वाटलं तू आपल्या घराण्याची अब्रू घालवावीस आणि आम्ही ते मुकाट खपवून घ्यावं?"
 त्याचा माझा शेतावर जाण्याशी काय संबंध येतो? आणि लग्न झाल्यावर इतक दिवस जातच होतो की मी. काय बिघडलं त्यानं? आता एकदमच का तुमचं माथं फिरलं?"
 "मी गावाला गेलो होतो. तुला एवढं बजावल्यावर मला वाटलं तू आपणच सगळा संबंध तोडशील आमच्याशी. पण तू निलाजरा निघालास."
 हा दादा, तोंड सांभाळून बोला. माझी लाज काढायचं कारण नाही. जमीन जशी तुमची आहे तशी माझीही आहे. मला तिथं जायची बंदी करायची असली तर मला माझ्या वाटणीची जमीन द्या."
 "वाटणी? कसली वाटणी?"
 "वडलोपार्जित जमीन आहे. त्यातली निम्मी माझी आहे."
 "अरे जा निम्मीवाला. तुला पाऊल ठेवण्यायेवढा तुकडाही मिळणार नाही."
 "कोर्टात दावा लावीन."
 "लाव, लाव. मला कोर्टाची भीती घालतो? एक मात्र ध्यानात ठेव. कोर्टात गेलास तर आत्ता तुला पैसे देतोय त्यातली फुटकी कवडीसद्धा दिसणार नाही. मग मरशील उपाशी. पैसे पाहिजे असले तर गुमान इथून जा आणि पुन्हा तोंड दाखवायला येऊ नको."
 सगळं ऐकल्यावर ती म्हणाली, "म्हणजे आपला सगळा खर्च त्यांच्या पैशावर चालतोय?"
 "त्यांच्या पैशांवर म्हणू नको. ते पैसे देतात म्हणजे काही उपकार नाही करीत. त्या पैशावर हक्क आहे माझा."
 "हक्क असला तरी देणारे तेच आहेत ना? कशाला जगायचं आपण त्यांनी दिलेल्या पैशावर? आपण काहीही करून स्वत:च पोट भरू शकू."
 "काहीही म्हणजे काय? मी आता नोकरी शोधत हिंडू?"
 "काय हरकत आहे?"

कमळाची पानं । १६९