रणजितलाही यायला नेहमीपेक्षा उशीर झाला. तो आला आणि तिच्याकडे न डोकावता सरळ आतल्या खोलीत निघून गेला. नेहमी आला की मागून येऊन तिला कवेत घ्यायचं, तिच्या पोलक्याच्या गळ्याच्या वरच्या उघड्या पाठीचा मुका घायचा, तिच्या ढुंगणावर चापट मारायची, कमीत कमी "अनू, मी आलोय ग," म्हणून आवाज द्यायचा असं काहीतरी केल्याशिवाय तो आत जात नसे. आज काय बिनसलंय म्हणून ती त्याच्या मागोमाग गेली. तो कपडे बदलत होता. त्याच्याजवळ गेल्याबरोबर ती म्हणाली, "तुम्ही दारू पिऊन आलायत."
तो एकदम उसळून म्हणाला, "हो. चोरी आहे का प्यायची मला?"
"मी कुठे असं म्हटलं? तुम्हालाच तसं वाटतंय, नाही तर तुम्ही तोंड लपवून का आत आला? आणि मी दारू प्यायलात म्हटल्यावर एकदम चिडलात का?"
"कारण तुझा स्वर असा होता की मी काही तरी गुन्हा केला."
ती जरा वेळ काहीच बोलली नाही. तो अधूनमधून दारू पितो हे तिला माहीत होतं, पण अशा तऱ्हेनं इतकी पिऊन तो कधी आला नव्हता. ती शक्य तितक्या शांतपणे म्हणाली, "रणजित. घरातल्या पुरुषाने दारू पिणं मला काही नवीन नाही. माझे बाबा पीत होते. आईला अधूनमधून मारीत पण होते. तुम्ही मला मारणार का? म्हणजे अगदी परंपरागत नवराबायकोचं चित्र पुरं होईल."
ती परत स्वैपाकघरात गेली. मनात कढावर कढ येत होते पण तिनं ते डोळ्यांवाटे वाहू दिले नाहीत. बाकी कशाहीपेक्षा, आपल्या लग्नाचं तारू ह्या सनातन खडकावर आपटावं ह्याचा तिला फार अपमान वाटत होता. जेवण नि:शब्दच झालं. आवराआवर करून ती गेली तेव्हा तो बिछान्यावर पडला होता. ती काही न बोलता त्याच्या शेजारी पडली तशी त्याने एकदम वळून तिला घट्ट मिठीत घेतलं. म्हणाला, "अनू, मला माफ कर. पुन्हा असं होणार नाही." मग मात्र तिचा बांध फुटला. त्याला बिलगून ती स्कुंदून स्फुंदून रडायला लागली. "मला तुमच्याशिवाय कोणी नाही. तुम्ही असं केलं तर मी कुणाकडे पहायचं?" रडण्याचा आवेग ओसरल्यावर ती म्हणाली, "आज काही झालं का?"
"काही नाही. व्हायचंय काय?" तिनं पुन्हा पुन्हा विचारलं तेव्हा सगळं बाहेर आलं. त्या दिवशी तो
पान:कमळाची पानं (Kamalachi pan).pdf/168
Appearance
हे पान प्रमाणित केलेले आहे.
कमळाची पानं । १६८