जिद्द हरवलेल्या तिला ह्या नव्या देशाने नोकरी, आधार, नवं आयुष्य दिलं होतं. पण म्हणून जो देश निम्मं-अर्धं आयुष्य होईपर्यंत तिचा होता त्याविषयीची तिची भावना घाण-गर्दी-गरिबी-बेशिस्त ह्यांपलिकडे पोचू नये?
ह्या ठिकाणी पोचल्यावर मी स्वत:ला जरासं खडसावलं. ती एक अमेरिकन बाई आहे आणि ती माझ्याकडे चार दिवस पाहुणी म्हणून आलीय. बस्स इतकंच. का म्हणून मी क्षुल्लक बाबींचं एवढ अवडंबर माजवत्येय! पण का ते मला माहीत होतं. ती अवचित माझ्या आयुष्यात परत येतेय म्हटल्यावर मी काही अपेक्षा ठेवून तिला भेटत होते आणि त्या पुऱ्या होत नाहीत म्हणून माझी निराशा होत होती. इथे ती एका खूप प्रतिष्ठा असलेल्या युनिव्हर्सिटीत प्राध्यापिका होती. नंतर भारत सरकारने नव्यानेच सुरू केलेल्या प्रज्ञाशोध प्रकल्पात एक वरिष्ठ अधिकारी होती. त्याचे काम करत असतानाच ती मला भेटली होती तेव्हा त्याबद्दल खूप उत्साहाने बोलत होती. त्या मानाने ती तिथे करीत असलेल्या कामात काही फारसं आव्हान नव्हतं. इथल्या शक्यता लक्षात घेता, तिचं तिथलं आयुष्य क्षुद्र वाटत होतं. मग म्हणून काय झालं, मी पुन्हा एकदा स्वत:ला खडसावलं. सर्वांनी काहीतरी महत्कार्य करीत अर्थगर्भ आयुष्यंच जगली पाहिजेत असा कुणी नियम केलाय! तिचं आयुष्य आहे, ते कसं जगायचं, कुठे जगायचं हा तिचा प्रश्न आहे. तिनं इतक्या सहजपणे घेतलेला कायमचं राहण्याचा निर्णय मला डाचण्याचं काही कारण नव्हतं. आणि असा निर्णय घेतल्यावर तो देश सर्वस्वी आपला मानून त्याच्यावर प्रेम कर नुसतं साहजिकच नव्हे, तर शहाणपणाचंही नव्हतं का?
एवढं सगळं चर्वितचर्वण केल्यावर मला जरा हलकं वाटलं. तरी अजून विमला आत्ता ह्या देशात आणि माझ्याकडे का आलीय ह्याचं उत्तर मिळत नव्हतं. ते पुढल्या काही दिवसांत मिळालं. तिला तिथे खूप एकटं वाटत होतं. इतकी वर्षे नोकरी, मुलं, घरकाम ह्या सगळ्यात कशी गेली कळलंच नाही पण आता कसला आधारच उरला नाही असं तिचं झालं होतं. मुलं लांब होती. त्याच्या आयुष्यात आता तिला काही स्थान नव्हतं. वर्षांतन एकदा भेट अधून मधून फोन, इतकंच.
"पण त्याबद्दल माझी काही तक्रार नाही. त्यांची आयुष्यं उत्तम घडवायची संधी मी त्यांना देऊ शकले ह्यात मला आनंद आहे."
पुन्हा तेच. त्यांची आयुष्यं इथे तितक्या चांगल्या तऱ्हेने घडू शकली नसती अशी तिची खात्री होती. अर्थात इथे राहिली काय किंवा तिथे, काय
पान:कमळाची पानं (Kamalachi pan).pdf/156
Appearance
हे पान प्रमाणित केलेले आहे.
कमळाची पानं । १५६
