येत नाही? इथली तुझी माणसं, आयुष्य, सांस्कृतिक बंध?"
"खरंच नाही. मी काही तरी महत्त्वाचं गमावलंय असं मला कधीच वाटलं नाही."
तिच्याबद्दल ज्या गोष्टींचं आकर्षण वाटून मी तिच्याकडे ओढली गेले, त्या गोष्टींमुळे खरं म्हणजे जे काही गमावण्यासारखं होतं ते तिनं आधीच गमावलं होतं असं तर नव्हतं? पण मग तिला कुणाचीच आणि कशाचीच आठवण येत नव्हती तर इतक्या वर्षांनंतर ती इथे परत कशाला आली होती, आणि जुन्या मित्र-मैत्रिणींना - ज्यांना ती गेल्या तीसेक वर्षांत भेटली नव्हती आणि बहुतेक पुन्हा कधीच भेटणार नव्हती - भेटून जुन्या आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न का करीत होती?
भेटल्याभेटल्या मी जेव्हा तिला म्हटलं, "विमला, you really are a voice from the past," तेव्हा ती म्हणाली होती, "नाही, तसं म्हणू नको. आपल्या भेटीचा भूतकाळाशी संबंध जोडू नको. आपण आत्ता इथे भेटतो आहोत." पण भूतकाळात संबंध नसता तर ती आत्ता भेटायला आलीच असती कशाला? की तिला हेच सांगायचं होतं की तो काळ, ती परिस्थिती आणि त्या आम्ही हे सगळं आता बदललं होतं? एखाद्या नात्यात सातत्य राहिलं नसलं की ते परत प्रस्थापित होऊ शकत नाही. मग ते एक नवंच नात निर्माण होतं. पण असं नवं नातं ह्या वयात, पुन्हा कधी भेटण्याची शक्यता नसताना ती का जोडू पहात होती? त्या जुन्या प्रेमाखातरच ना? पण नव्यानं नातं जोडायचं तर आम्ही दोघीही पूर्वीच्या राहिलो नव्हतो. त्या काळी ज्या गोष्टींनी मला आकर्षित केलं होतं त्यांना माझ्या लेखी काही अर्थ राहिला नव्हता. ह्या क्षणी आम्ही प्रथमच एकत्र आलो असतो तर एकमेकींबद्दल मैत्री करण्याइतकं आकर्षण वाटलं असतं आम्हाला? माझ्या तर मनात तिच्याबद्दल जराशी अढीच निर्माण झाली होती. भारतात आयुष्याची पहिली तीस-पस्तीस वर्षे घालवलेल्या बाईने साधं मुंबईहून दोनशे किलोमीटर प्रवास करून यायचं ह्या गोष्टीचा केवढा बाऊ केला होता. कबूल आहे, अडचणी, संकटं येऊ शकतात. पण अमेरिकेत काहीच होऊ शकत नाही? अगदी कबूल की ह्या देशाबद्दल टीका करण्यासारखं खूप काही आहे. पण तिला आवडलेलं, तिच्या आठवणीत घर करून राहिलेलं असं काहीच नव्हतं? तिचं दत्तक देशाबद्दलचं प्रेम मी समजू शकत होते. तिचं लग्न मोडल्याचा मोठाच धक्का तिला बसला होता. तो पचवून इथे येऊन स्वत:साठी नवं आयुष्य उभारण्याची
पान:कमळाची पानं (Kamalachi pan).pdf/155
Appearance
हे पान प्रमाणित केलेले आहे.
कमळाची पानं । १५५