पान:कमळाची पानं (Kamalachi pan).pdf/157

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

फरक पडला असता? ती इथे असती तरी बहुतेक तिची मुलं अमेरिकेत जाऊन राहिली असती. शेवटी तिच्या एकटेपणावर मुलं किंवा नवरा हा उतारा नव्हताच. नसतोच."
 मी म्हटलं, "तिथे मित्र-मैत्रिणी असतील की तुझ्या.”
 "आहेत ग तशी. तिथली माणसं खूप प्रेमानं वागतात. मदत करायला सुद्धा खूप तत्पर असतात. इथल्यापेक्षा सुद्धा जास्त. तरी पण तरुणपणी केलेल्या मैत्रीइतकी जवळीक होऊच शकत नाही नंतरच्या मैत्रीत."
 मला तिची गंमत वाटली. त्या देशाशी सर्वार्थाने समरस झालेल्या, एवढंच नव्हे तर तिथे जाऊन आपलं भलंच झालं असं मानणाऱ्या तिला शेवटी ही सांस्कृतिक दरी ओलांडता येत नव्हती. नाही तर वयाचा मैत्रीशी काय संबंध असतो? पण तिला हे कसं समजत नव्हतं की आमच्यातही आता काही समान धागा उरला नव्हता? मी हायस्कूलमध्ये असताना एक पेन-फ्रेंड ही टूम निघाली होती. कुणीतरी कुठकुठले पत्ते दिले होते. आम्ही मुली उत्साहाने पत्रं लिहीत होतो. मला एक स्कॉटिश मैत्रीण मिळाली होती. एकमेकींच्या शाळा, शिक्षण, शहराचं वर्णन, कुटुंबाच्या फोटोंची अदलाबदल इतकं झाल्यावर पुढे काय? संवाद थोपला. विमलाचं आणि माझं तसंच नव्हतं का? एकमेकींच्या अपरिचित, अज्ञात आयुष्यात डोकावून पहात रहाणं हा संवादाचा पाया होऊ शकत नाही.
 ती जायच्या आदल्या दिवशी, तिला फार पूर्वी आवडायच्या म्हणून, आणि हा पदार्थ अजूनही अमेरिकेत मिळत नसावा म्हणून, पुरणपोळ्या केल्या होत्या. ती म्हणाली, "तु माझे इतके लाड केलेयस की इथनं जाऊच नयेसं वाटतं."
 "मग राहा की इथेच."
 "माझा सगळा कार्यक्रम आखलेला आहे. परतीचं बुकिंगसुद्धा झालंय."
 "तसं नाही, कायम इथेच येऊन राहाण्याबद्दल बोलतेय मी. आम्ही तुला एक तुकडा देतो जमिनीचा. घर बांध आणि राहा इथे."
 तिच्या डोळ्यांत पाणी आलं. "किती सहजपणे तू एक नवं आयुष्य देऊ केलंस मला. पण ते आता शक्य नाही. इथल्या धकाधकीत मी टिकू शकणार नाही." मग म्हणाली, "तुझे आभार मानणं म्हणजे उद्धटपणा होईल, पण हे आठ दिवस मी विसरू शकणार नाही. आयुष्यात प्रथमच माहेरी येणं म्हणजे काय ह्याचा मला अनुभव आला. आता मी तुला सोडणार नाही. आपण

कमळाची पानं। १५७