पान:कमळाची पानं (Kamalachi pan).pdf/153

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 इतक्या वर्षांच्या खंडानंतर सुद्धा आमच्यात काही अवघडलेपण जाणवलं नाही. उलट तिच्या आयुष्यातल्या माझ्या दृष्टीने मोकळ्या जागा भरायला ती उत्सुक होती. मुख्य म्हणजे तिनं देश सोडून परदेशात स्थायिक व्हायचं का ठरवलं ह्या बद्दल मला कुतूहल होतं.
 ती म्हणाली, "खरं म्हणजे त्याला कारण सत्यशील होता असं म्हटलं तरी चालेल."
 "तुमची फारकत झाल्याचं मी उडत उडत ऐकलं होतं. काय झालं एकदम?"
 "मी पुण्याला तुला भेटले होते ना, त्यानंतर मला ही फेलोशिप मिळाली. माझ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संमतीनेच अर्ज केला होता, तरी मी फारशी आशा ठेवली नव्हती. पण मिळाली, अर्थातच मी ती स्वीकारली कारण ही संधी गमावणं शक्यच नव्हतं. सुरुवातीला दोन वर्ष, मग दोन वर्षं वाढवून मिळणार होती. दरवर्षी एक महिना सुट्टी आणि येण्याजाण्याचा खर्च. आयुष्यात मिळालेली सर्वात मोठी संधी, पण तीच माझं लग्न मोडायला कारण झाली. मी सत्यशीलपासून इतके दिवस दूर राहिले ह्याचं निमित्त झालं. त्याच्या कंपनीने दुबईत कंत्राटं घेतली होती तेव्हा मी महिनेनमहिने एकटी राहात असे. त्यावेळी तर मुलं लहान होती आणि सगळ्या जबाबदाऱ्या एकटीनं संभाळणं मला खूप कठीण जात असे. नेमकं काय आणि कसं झालं ते काही मला कळलं नाही, पण तो दुसऱ्या कुणाच्या तरी प्रेमात पडला. तो माझ्यापासून लपवीतच होता, पण मुलांनी मला सांगितलं. मग मी त्याला सरळच विचारलं तेव्हा तो म्हणाला हो, मला घटस्फोट पाहिजे आहे. नाही तरी तुला आता आपल्या संसारात काही रस उरलाच नाहीये. जे घडत होतं त्याची जबाबदारी तो माझ्यावरच ढकलू पहात होता. पुढे कधी कधी विचार करताना मला वाटलं की ही प्रक्रिया आधीच सुरू झालेली होती. माझं परदेशी जाणं हे नुसतं निमित्त झालं. एकदा नातं तुटलं की का, कसं ह्याचा उहापोह करून काहीच हाती लागत नाही. त्याच्यापाशी भीक मागायची नाही असं मी ठरवलं आणि तडकाफडकी चालती झाले. परत न येण्याचा निश्चय करून."
 "पण का? तो तू ह्या देशात राहण्याचं एकुलतं एक कारण होतं का?"
 "तसं नाही. तरी पण त्याचं घर सोडून द्यायचं तर कुठे जाणार इथपासून प्रश्न होता. आणि तसं माझी फेलोशिप सुरू असेपर्यंत मी फक्त त्याला आणि मुलांना भेटण्यासाठी येत असे. तेव्हा तोपर्यंत तरी येण्यात काही अर्थ नव्हता."
 "तुझ्या माहेरच्यांचं काय?

कमळाची पानं । १५३