पान:कमळाची पानं (Kamalachi pan).pdf/128

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

नव्हते, त्यांनी प्रेमाचा उन्माद अनुभवला नव्हता. तिचे हात झटकून टाकून तो एकदम उठला.
 "सिद्धार्थ, तुझं माझ्यावर प्रेम राहिलं नाही का रे?"
 "माझं तुझ्यावर किती प्रेम आहे ते मी शब्दांत सांगू शकत नाही, मनीषा. पण मनात असे विचार करताना तुझा स्पर्शही नकोसा वाटतो. वाटतं, ह्याच शरीरानं त्याचा स्पर्श अनुभवला असेल का?"
 अगतिकतेनं ती रडायला लागली. तो एकीकडे काहीबाही बोलत होता विचारीत होता, पण ती ऐकण्याच्या, उत्तर देण्याच्या पलिकडे गेली होती. रडतारडता तिला कधी झोप लागली, त्यानं लागू दिली हेही तिला का नाही. सकाळी ती नेहमीप्रमाणं लवकर उठली तर तो घोरत पडला होता. तिच्या मनात आलं, हा मला रोज अर्धी रात्र जागवतो आणि स्वत:ची झोप मात्र अशी भरून काढतो! प्रेम ज्याला म्हणतात ते असंच असतं?
 तिचं त्याच्यावर प्रेम बसावं ही गोष्ट त्याला अद्भ़ुत वाटायची. माझ्यात काय पाहिलंस तू, असं तो तिला वरच्यावर विचारायचा, आणि तिला तो आपल्या प्रेमाला पात्र आहे हे त्याला वारंवार पटवून द्यावं लागायच. कधी म्हणायचा, "आपण लोकांना किती विजोड दिसत असू, नाही?" तिला खूप हसू यायचं.
 ती शेलाट्या, लवलवत्या बांध्याची, सावळी, नाकीडोळी सुरेख. तिच्या काळ्याभोर डोळ्यांच्या आड नेहमी हसू असायचं, काहीतरी झालं की खुद्कन बाहेर पडायला टपलेलं. ती त्याची मस्करी करायची आणि तो गोंधळल्यासारखा झाला की खळखळून हसायची. तिच्या रूपानं, हसऱ्याखेळत्या वृत्तीनं त्याला मोहवलं होतं. आपलं इतके दिवस अतीच रुक्षपणे जगलेलं आयुष्य तिच्यामुळे उजळून गेलंय असं त्याला वाटायचं.
 तो ठेंगण्यातच जमा होणारा, तिच्यापेक्षा, अगदी काटेकोरपणाच करायचा तर, जेमतेम अर्धा इंच उंच. जरा रुंदच नाक. जाड ओठ, अरुंद कपाळावर गर्दी करणारे राठ कुरळे केस. तिच्याशेजारी आपल्या रूपाची त्याला लाज वाटायची. पण त्याची रुंद शरीरयष्टी, जमिनीवर भक्कम पाय रोवून उभं राहण्याची लकब तिला आश्वासक वाटायची. त्याचा आदर्शवाद, ज्यांना आयुष्यात काही संधी मिळाली नाही अशांसाठी काम करण्याची तळमळ हे तिला मनापासून आवडलं होतं. समाजातल्या आहेरे वर्गाला आणि समाजाच्या स्वास्थ्याला सुरुंग लावणाऱ्या मंडळींपेक्षा तिला सिद्धार्थाची परिवर्तनवादी

कमळाची पानं । १२८