पान:कमळाची पानं (Kamalachi pan).pdf/127

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

झोपू दे बिचारीला.' पण थोडा वेळ
थांबून त्यानं पुन्हा हाक मारली, कुजबुजत्या आवाजात. शेवटी तो खाटेवरून उठून तिच्याजवळ आला.
 "सिद्धार्थ, झोपू दे ना मला..... मी दमलेय रे."
 "मला फक्त एवढंच सांग, किशोरचे आणि तुझे काय संबंध आहेत?"
 "काही नाहीत! तुला मी हे शंभरदा सांगितलंय. मी कितीही जीव तोडून सागितलं तरी तुझा जर विश्वासच बसत नसला, तर तू मला पुन्हा पुन्हा तोच प्रश्न विचारण्यात काय अर्थ आहे?"
 "पण मग त्या दिवशी उशिरापर्यंत, मी नसताना तो इथं काय करीत होता?"
 लहान मुलं पाठ केलेला धडा जसा एकसुरी आवाजात म्हणतात तसं ती म्हणाली, "तो आला होता तुला भेटायला. मी सांगितलं, 'सिद्धार्थ नाहीये, तू जा आणि संध्याकाळी परत ये.' त्यानं मी काय म्हणते त्याच्याकडे दुर्लक्षच केलं. तो म्हणाला, 'मी सिद्धार्थ येईपर्यंत थांबतो.' हे सगळं मी तुला शंभरदा सांगितलंय."
 "तू त्याला पुरेसं ठासून सांगितलं नसशील!"
 "सिद्धार्थ, तू ज्याच्यावर संशय घेतोयस तो तुझा मित्र आहे, माझा नाही. मला तो वळीअवेळी आलेला आवडत नाही. तूच त्याला सवय लावून ठेवलीयस तू असलास किंवा नसलास तरी इथे येऊन बसायची, खायची-प्यायची, झोपायची. आता तुला तो यायला नको असला, तर तूच त्याला स्पष्ट सांग."
 "मी कसं सांगू! आज गेली कित्येक वर्षं तो माझा मित्र आहे, सहकारी आहे. माझ्या खांद्याला खांदा लावून काम केलंय त्यानं."
 "मग हा तिढा सुटायचा कसा? हवं तर मी सांगते त्याला. पण मला सांगावं लागेल तू त्याच्यावर संशय घेतोयस म्हणून, मग तो ऐकेल माझं."
 "नको. तसं सांग नको. तो फार दुखावेल."
 ह्यावर ती काहीच बोलली नाही. बोलण्यासारखं उरलंच नव्हतं काही. तिला त्याचा राग येत होता. पण कीवही येत होती. कारण तो करीत असलेले आरोप बिनबुडाचे होते तरी त्याच्या डोळ्यांत तिला दिसणारी वेदना खरी होती. तिनं त्याचे खांदे धरून त्याला आपल्याजवळ ओढलं. नुसत्या त्या स्पर्शानं तिचं अंग थरथरलं. किती दिवसांत ते असे एकमेकांजवळ आले

कमळाची पानं । १२७