आशावादी वृत्ती जास्त भावली. तिचे सहकारी तिला म्हणाले, "तू बाटलीस!"
"असू दे. तुम्ही फक्त आहे ते उद्ध्वस्त करण्याच्या गोष्टी बोलता. पण त्याच्या जागी काय येणार, कसल्या तऱ्हेचं जग निर्माण होणार, त्यात माझ्या मुलांना सुखानं जगता येईल ह्याची हमी कोण घेणार..... ह्याची उतरं तुम्ही देऊ शकत नाही."
ज्योतिर्मय तिला कडवटपणे म्हणाला, "सुखानं जगणं एवढंच ध्येय असतं आयुष्यात?"
"हो." ती ठामपणे म्हणाली. "तुमच्या मार्गाचंसुद्धा अंतिम ध्येय तेच आहे ना?"
"अंतिम सगळी उलथापालथ घडल्यानंतर. नवा समाज घडल्यानंतर."
"परिवर्तनानेच नवा समाज घडेल."
"हा:! परिवर्तन! फार बदललीस तू मनीषा. तुला आहे त्या चौकटीत असणाऱ्या मध्यमवर्गीय सुखासमाधानाच्या संसाराची हाव सुटलीय, म्हणून तू डोळ्यांवर झापडं ओढून घेतलीयस. हा निर्लज्ज समाज परिवर्तनानं बदलायला हजार वर्ष लागतील."
ज्योती तिचा गुरू, मित्र, सहकारी. एक बिनधास्त माणूस. कॉलेजात त्याचा एक ग्रुप होता. एक अनामिक अस्वस्थता, आपल्याला आयुष्यात वेगळं काही तरी मिळवायचं आहे अशी भावना, ह्यांतून ती अटळपणे ज्योतीच्या ग्रुपकडे खेचली गेली होती. तिथे झडणाऱ्या चर्चा, प्रचलित व्यवस्थेवर प्रहार करणारी भाषणं, मध्यमवर्गीय नैतिकतेच्या कल्पनांची हेटाळणी ह्या सगळ्यांमुळे तिच्या मन:स्थितीला प्रतिसाद मिळाला. त्याचबरोबर तितक्याच अटळपणे ती ज्योतीतही गुंतत गेली. त्याला तिच्याबद्दल ओढ वाटत होती हे तिला कळत होतं. पण त्यांच्या परस्पर आकर्षणाची निष्पत्ती लग्नात व्हावी असं ती सुचवू शकत नव्हती. तो नेहमी म्हणायचा, "कुठल्याही दोन माणसांनी एकमेकांवर मालकीहक्क प्रस्थापित करणं म्हणजे त्यांच्या नात्याचा शेवट असतो."
आणि मग तिला सिद्धार्थ भेटला होता. सिद्धार्थ त्यांच्याच कॉलेजात शिकलेला होता. पण आता परत आपल्या घरी जाऊन राहात होता. काही कामासाठी आलेला असताना त्यांच्या चर्चागटातल्या एकानं त्याला आणलं होतं. "हा सिद्धार्थ. खेडवळ दिसतो. पण बोलण्यात तुम्हाला कुणाला हार जायचा नाही." सिद्धार्थ नुसताच शांतपणे हसला होता. त्याचा न इस्तरलेला सदरा, पायजमा, हवाई चपला ह्यांमुळे तो त्या सगळ्यांच्यात वेगळा दिसतच
पान:कमळाची पानं (Kamalachi pan).pdf/129
Appearance
हे पान प्रमाणित केलेले आहे.
कमळाची पानं । १२९